आठ दिवसांत ‘कोविड जनजागृती’चा दीड लाखाचा टप्पा पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 10:48 AM2020-04-29T10:48:18+5:302020-04-29T10:49:34+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभाग व शिव सहायता आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या कोविड-१९ आॅनलाईन जनजागृती मोहिमेस ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभाग व शिव सहायता आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या कोविड-१९ आॅनलाईन जनजागृती मोहिमेस प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या आठ दिवसांत दीड लाखांहून अधिक जणांनी ही चाचणी देऊन प्रशस्तिपत्रे मिळविली आहेत.
आॅनलाइन प्रश्नमंजुषा चाचणी या मोहिमेचा मुख्य उद्देश कोविड विषयीची वस्तुनिष्ठ माहिती लोकांपर्यंत पोचविणे असा आहे. या चाचणीत कोविड म्हणजे काय?, त्याची उत्पत्ती कोठे झाली?, कोविडची लक्षणे आणि काळजी कशी घ्यावी, आदी स्वरूपातील २० प्रश्नांचा समावेश आहे. आजपर्यंत १ लाख ६० हजारांहून अधिक लोकांनी या मोहिमेत सहभागी होऊन प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.
दि. २१ एप्रिलपासून कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित जनजागृती मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेसाठी एनएसएसचे संचालक प्रा.अभय जायभाये, शिवसहायता आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे डॉ. डी. के. गायकवाड, तंत्रविज्ञान अधिविभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल कुलकर्णी, स्वयंसेवक अविनाश पवार हे योगदान देत आहेत. या चाचणीत कोरोनाबाबत जनजागृतीवर आधारित प्रश्नांचा समावेश आहे. समाजातील सर्व घटकांनी या मोहिमेत सहभागी होऊन कोविड बाबतच्या जनजागृतीस प्रतिसाद द्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिंदे यांनी केले आहे.