दीड लाख मतदार निवडणार कारभारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:17 AM2021-01-01T04:17:12+5:302021-01-01T04:17:12+5:30
शिरोळ : छाननीनंतर आता इच्छुक उमेदवारांचे लक्ष माघारीकडे लागून राहिले आहे. १५ जानेवारीला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ३३ ...
शिरोळ : छाननीनंतर आता इच्छुक उमेदवारांचे लक्ष माघारीकडे लागून राहिले आहे. १५ जानेवारीला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ३३ गावचे कारभारी होण्याचे स्वप्न १ लाख ५१ हजार ७२५ मतदारांच्या हाती राहणार आहे.
शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात आघाड्यांची व्यूहरचना आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. तालुक्यात १९६४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननी प्रक्रियेत अर्ज अवैध ठरल्यामुळे इच्छुक उमेदवारांत नाराजी दिसून आली. चुकीच्या पध्दतीने अर्ज भरल्यामुळे काही इच्छुकांचा पत्ता कट झाला.
४ जानेवारीला माघारीचा अंतिम दिवस आहे. त्यानंतर प्रत्यक्षात प्रचाराला सुरुवात होणार आहे. निवडणुकीचा रणसंग्राम आठवडाभरच चालणार आहे. राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, स्थानिक गटातटातील नेत्यांनी चांगली बांधणी केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला टप्पा गटप्रमुखांसह अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांचा पूर्ण झाला आहे. अर्जुनवाडसह शिरढोण, घोसरवाड, दत्तवाड, यड्राव, नांदणी, चिपरी, दानोळी, उदगाव, कोथळी या गावच्या निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत. ३३ गावच्या ग्रामपंचातीच्या निवडणुका मोठ्या गावात दुरंगी होण्याची शक्यता दिसून येत आहे. सोयीच्या आघाड्या झाल्यामुळे कार्यकर्त्यांच्या लढाईत गावपुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.