ओरिसातील एका खातेदारास अटक-एचडीएफसी बँक दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 12:14 AM2019-05-07T00:14:12+5:302019-05-07T00:17:11+5:30
एचडीएफसी बँकेच्या येथील शाहूपुरी शाखेतून ६७ लाख ८८ हजार रुपयांच्या आॅनलाईनद्वारे दरोड्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी ओरिसा येथून एका खातेदाराला शिताफीने अटक केली. संशयित दुर्जन रामसाय भोगता (वय ३०, रा. कचारू, डोंगरी टोला, कचारू, कॉरमुंडा, जि. सुंदरगड, ओरिसा) असे त्याचे नाव आहे.
कोल्हापूर : एचडीएफसी बँकेच्या येथील शाहूपुरी शाखेतून ६७ लाख ८८ हजार रुपयांच्या आॅनलाईनद्वारे दरोड्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी ओरिसा येथून एका खातेदाराला शिताफीने अटक केली. संशयित दुर्जन रामसाय भोगता (वय ३०, रा. कचारू, डोंगरी टोला, कचारू, कॉरमुंडा, जि. सुंदरगड, ओरिसा) असे त्याचे नाव आहे. त्याच्या खात्यावर एकावेळी २६ लाख आले, त्यानंतर काही वेळातच ते त्याने काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हे पैसे कोणी टाकले, ते कोणाला देणार होता, यासंबंधी पोलीस चौकशी करीत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.
एचडीएफसी बँक आॅनलाईन दरोड्यामध्ये हॅकर्सने परराज्यातील ३४ लोकांच्या बँक खात्यांवर रक्कम वर्ग केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या आॅनलाईन दरोड्यातील मास्टरमार्इंड झारखंडचा असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार शाहूपुरी पोलिसांची चार पथके झारखंड, कोलकाता व ओरिसाला गेले होते. आतापर्यंत या गुन्ह्यात झारखंड येथून तीन आणि कोलकाता येथून एक असे चार संशयित ताब्यात घेतले आहेत. त्यापैकी ओरिसा येथील खातेदार दुर्जन भोगता याला शिताफीने पोलिसांनी अटक केली. तो सराईत असून, त्याच्या खात्यावर वारंवार रकमा पडल्याचे दिसून येत आहे.