कोल्हापूर : गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या एकास अटक, 8 लाखाचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 03:51 PM2021-11-15T15:51:55+5:302021-11-15T15:52:21+5:30
गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एकास राज्य उत्पादन शुल्कच्या पोलिसांनी अटक केली. अविनाश अनंत मोहिते (वय-34, सध्या. रा. कुर्ली बाजारपेठ जवळ ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग) अस या ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे
कोल्हापूर - गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एकास राज्य उत्पादन शुल्कच्या पोलिसांनी अटक केली. अविनाश अनंत मोहिते (वय-34, सध्या. रा. कुर्ली बाजारपेठ जवळ ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग) अस या ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याचाकडून 8 लाख 39 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कबनूर ता. हातकणंगले नजीक आज, सोमवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, कबनूर नाका येथून गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला. दरम्यान कबनूर नाका येथे एक तवेरा कार संशयितरित्या आढळली. पोलिसांनी या कारची कसून तपासणी केली असता कार मध्ये गोवा बनावटीचा मद्यसाठा आढळून आला. पोलिसांनी या बनावट मद्यसाठ्यासह संशयिताची तवेरा कार ताब्यात घेत सुमारे 8 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे इचलकरंजी विभागाचे निरीक्षक पी. आर. पाटील यांच्या पथकातील दुय्यम निरीक्षक राहुल गुरव, पी. डी. कुडवे, बी. आर. पाटील, एस. डी. माने आदीनी केली. याप्रकरणी पुढील तपास निरीक्षक पी. आर. पाटील करीत आहेत.