बेकायदा लिंग चाचणी करताना एकास रंगेहात पकडले; आरोग्य पथक, पोलीस पथकाच्या कारवाईनं भुदरगड तालुक्यात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 11:05 PM2023-01-17T23:05:31+5:302023-01-17T23:06:29+5:30

जिल्हा आरोग्य पथक व जिल्हा पोलीस पथकाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने भुदरगड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

One caught red-handed doing illegal gender testing; action in the Bhudargarh taluk | बेकायदा लिंग चाचणी करताना एकास रंगेहात पकडले; आरोग्य पथक, पोलीस पथकाच्या कारवाईनं भुदरगड तालुक्यात खळबळ

फोटो ओळ - विजय कोळस्कर

Next

शिवाजी सावंत -

गारगोटी : मडिलगे खुर्द ता. भुदरगड येथे बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करताना पोलिसांनी एकाला रंगेहात पकडले आहे. विकास ऊर्फ विजय लक्ष्मण कोळस्कर असे संशयिताचे नाव आहे. जिल्हा आरोग्य पथक व जिल्हा पोलीस पथकाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने भुदरगड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
 
मडिलगे खुर्द येथे संशयित विजय कोळस्कर हा त्याच्या राहत्या घरी यंत्राद्वारे बेकायदेशीर लिंग तपासणी करीत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य पथक व जिल्हा पोलीस पथकाला लागली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून विजय लक्ष्मण कोळस्कर याच्याकडे गर्भलिंग चाचणीसाठी महिला पाठवून दिली. त्या महिलेची गर्भलिंग चाचणी करताना त्याला रंगेहात पकडले. त्याच्या घरातील सोनोग्राफी मशीन व गर्भनिरोधक गोळ्या ताब्यात घेतल्या आहेत. 

जिल्हा आरोग्य पथकातील ॲड गौरी पाटील, गारगोटी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिलिंद कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आनंद वर्धन यांच्यासह जिल्हा पोलीस पथक व स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली. याबाबतचा गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसात सुरू आहे.
 
लाखोंची उड्डाणे -
संशयित हा काही वर्षांपूर्वी कागल  एमआयडीसी मध्ये नोकरीस होता.त्यातून त्याची ओळख बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या लोकांशी झाली.कमिशन एजंट म्हणून काम करता करता अमाप पैसा मिळवून स्वतःचे सोनोग्राफी मशीन घेतले.आणि स्वतः चा गर्भलिंग निदान चाचणी करण्याचा गोरख धंदा सुरू केला.या कुकर्मातून लाखो रुपयांची माया जमविली आहे.आज त्याच्याकडे गाडी, बंगला,लाखो रुपयांची शेअर बाजारात गुंतवणूक असल्याची चर्चा सुरू आहे .

नवजात बालकांचे जीव घेऊन लक्षाधीश -
   या गोरख धंद्यात अनेकजण गुंतले असून यातून लाखोंची माया जमविली आहे.पण जगात येण्याआधी आईच्या गर्भात नरडीचा घोट घेणाऱ्या या नराधमाना कायद्याने कडक कारवाई होत नाही . गुन्हा दाखल झाल्यावर हे निर्दोष कसे काय सुटतात हा सर्वसामान्य जनतेला पडलेला "अर्थपूर्ण" यक्ष प्रश्न आहे.

पैसे कमावण्याच्या हव्यासाने केलेले पाप कोठे फेडतील? -
   गर्भलिंग चाचणी करण्यासाठी पंचवीस हजार तर गर्भपात करण्यासाठी पस्तीस ते चाळीस हजार रुपये असा दर आहे.या राक्षसी मनोवृत्तीने पैसे कमविण्यासाठी गर्भात मुलगा असला तरी मुलगी असल्याचे सांगून गर्भपात करायला लावले आहेत.

Web Title: One caught red-handed doing illegal gender testing; action in the Bhudargarh taluk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.