सावकारी प्रकरणी एकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 12:34 PM2020-01-31T12:34:36+5:302020-01-31T12:35:24+5:30
कोल्हापूर : व्याजाने घेतलेल्या ३० हजार रुपयांचे १५ टक्के व्याज व दंड दिला नाही; त्यामुळे राहते घर ताब्यात घेण्याची ...
कोल्हापूर : व्याजाने घेतलेल्या ३० हजार रुपयांचे १५ टक्के व्याज व दंड दिला नाही; त्यामुळे राहते घर ताब्यात घेण्याची धमकी देऊन, दमदाटी करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नानू मिसाळ (रा. सरनोबतवाडी, खणीशेजारी) याच्यावर शाहूपुरी पोलिसांत गुरुवारी रात्री गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी सुनीता अश्विन गुजर (वय ४०, रा. प्रकाश विद्यामंदिर, सदर बाजार, सध्या रा. संजय गांधी हौसिंग सोसायटी) यांनी फिर्याद दाखल केली.
शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता गुजर यांनी आईच्या आजारपणासाठी नानू मिसाळ याच्याकडून २०१८ मध्ये ३० हजार रुपये १५ टक्के व्याजदराने घेतले होते. त्यांना १० हजार रुपये रोख, तर २० हजार रुपयांच्या अर्बन बँकेच्या धनादेशाद्वारे ही रक्कम दिली होती. गुजर यांनी कर्जाची रक्कम, व्याजासह सात महिने नियमितपणे परतफेड केली. या दरम्यानच्या त्यांच्या आईची तब्येत आणखी खालावल्याने हप्ते वेळच्या वेळी देणे त्यांना शक्य झाले नाही. दर महिन्याच्या पाच तारखेच्या पुढे हप्ता गेल्याने ५०० रुपये दंडाची आकारणीही मिसाळ याने केली. या दरम्यान त्यांच्या आईचा मृत्यू झाला.
गुजर यांनी सप्टेंबर २०१८ पर्यंत व्याजासह ३० हजार ५०० रुपये आणि दंडाचे ६५०० अशी एकूण ३७ हजार रुपयांची परतफेड केली. मात्र, त्यानंतर पैसे देणे त्यांना शक्य नसल्याने त्याने पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. मिसाळ याने २५ जानेवारी रोजी पैशांसाठी मुलाला धमकावले तसेच राहते घर ताब्यात घेण्याची धमकी दिली. आजपर्यंत ३७ हजारांची परतफेड करूनही अजून व्याजासह ८८ हजार रुपये झाल्याचे त्याने सांगितले. ही रक्कम दिली नसल्याने आर्थिक पिळवणूक आणि धमकी दिल्याचे गुजर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. मिसाळ याच्यावर महाराष्ट्र सावकारी अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.