मगदूम हायस्कूलमध्ये ‘समाजासाठी एक दिवस’
By admin | Published: December 3, 2015 11:31 PM2015-12-03T23:31:06+5:302015-12-03T23:47:31+5:30
निधी ‘आनंदवन’ला देणार : ११५० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
जयसिंगपूर : निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील हौसाबाई मगदूम पब्लिक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजतर्फे शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहारज्ञान समजावे यासाठी ‘समाजासाठी एक दिवस’ हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये ११५० विद्यार्थ्यांनी भाग घेऊन प्रत्यक्ष व्यवहारज्ञान अनुभवले.मगदूम हायस्कूलमध्ये प्रत्येक वर्षी सिद्धिविनायक जत्रा, असे उपक्रम राबविले जातात. यावेळी ‘समाजासाठी एक दिवस’ हा उपक्रम राबविण्यात आला. बालवाडी ते दहावीपर्यंच्या ११५० विद्यार्थ्यांचे गट तयार करून प्रत्येक गटाला वेगवेगळ्या ठिकाणी एक दिवस काम करण्यास सांगण्यात आले. यामध्ये पार्वती औद्योगिक वसाहत, पाईप कारखाना, बागवान गॅस एजन्सी, आमटे हॉस्पिटल, दातांचा दवाखाना, बेकरीज, स्टेशनरी दुकान, कापड दुकान, शॉपिंग मॉल अशा ठिकाणी जेथे काम मिळेल तेथे काम करून एक दिवस कष्टाने पैसे मिळविले. एका दिवसात कष्टाने मिळालेला निधी हेमलकसा येथील डॉ. प्रकाश आमटे यांच्या कुष्ठरोगी व आदिवासी पुनर्वसन आश्रमाला विद्यार्थ्यांमार्फत पाठविण्यात येणार आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुकुमार मगदूम, उपाध्यक्षा डॉ. शुभांगी मगदूम, प्राचार्य विलास सासमिले यांच्यासह सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)
बालवाडी ते दहावीपर्यंतच्या ११५० विद्यार्थ्यांचे गट
पार्वती औद्योगिक वसाहत, पाईप कारखान, गॅस एजन्सी, आमटे हॉस्पिटल, बेकरीज, स्टेशनरी दुकान, कापड दुकान, शॉपिंग मॉल येथे काम केले.