एक दिवस आरोग्यासाठी, घालूया सूर्यनमस्कार...
By admin | Published: February 11, 2016 12:02 AM2016-02-11T00:02:23+5:302016-02-11T00:33:31+5:30
‘लोकमत’चा उपक्रम : शनिवारी शहाजी लॉ कॉलेजच्या प्रांगणात सामुदायिक सूर्यनमस्कार
कोल्हापूर : दैनंदिनी कामाच्या व्यापात शारीरिक व्यायामाचा अभाव, सततची धावपळ, ताणतणाव, खाण्यातील अनियमितपणा यामुळे काही ना काही व्याधी जडल्या की मग व्यायाम करायला पाहिजे, याची खात्री पटते. या संदर्भात अधिकाधिक जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने ‘लोकमत’च्या पुढाकाराने ‘एक दिवस आरोग्यासाठी सूर्यनमस्कार’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शहाजी लॉ कॉलेजच्या मैदानावर शनिवारी (दि. १३) सकाळी ६.३० वाजता हा उपक्रम होत असून यासाठी सर्वांना मोफत प्रवेश आहे.
सूर्यनमस्कार ही भारतीय आरोग्यशास्त्राने संपूर्ण जगाला दिलेली देणगी आहे. घरच्या घरी, कमी वेळात होणारा, बिनखर्चाचा, कमी जागेत व इतर साधनांव्यतिरिक्त सूर्यनमस्कार घालता येऊ शकतो. आबालवृद्धांसह महिलाही या व्यायामाद्वारे आपले शरीर सुदृढ करू शकतात. त्यासाठी कुठल्या विशिष्ट आहाराची किंवा डाएटिंगची गरज नाही. या व्यायामाची सवय लोकांना लागावी या उद्देशाने घेण्यात आलेला हा उपक्रम सर्वांसाठी खुला आहे. तसेच माधवबाग क्लिनिक्सच्या वतीने ‘निरोगी हृदय’ या विषयावर तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमात सहभागी प्रत्येक व्यक्तीला ‘माधवबाग’तर्फे हार्ट रेट, ब्लड फ्रेशर, ईसीजी तपासणी मोफत करण्याचे कुपन दिले जाणार आहे. तसेच ‘लोकमत’तर्फे सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी ‘माधवबाग क्लिनिक्स्
ा’ हे मुख्य प्रायोजक आहेत, तर पतंजली योग समिती यांच्या सहकार्याने हा उपक्रम होत आहे. ‘माधवबाग’मध्ये हृदयरोगावर विनाशस्त्रक्रिया उपचार केले जातात. महाराष्ट्रात यांची १३० क्लिनिक्स आहेत. आतापर्यंत एक लाखाहून अधिक रुग्णांनी या क्लिनिक्सचा लाभ घेतला आहे. या उपक्रमात कोणत्या शाळा, महाविद्यालय किंवा ग्रुपला
सहभागी व्हायचे असेल तर ‘लोकमत’च्या लक्ष्मीपुरी येथील शहर कार्यालयात किंवा सचिन ९७६७२६४८८५ यांच्याशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी)