सरकार भाजपचेच तरीही आंदोलन का करावे लागते?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 02:56 PM2024-06-11T14:56:48+5:302024-06-11T14:57:04+5:30

प्रश्नाची तड लावण्यापेक्षा महापालिका निवडणुकीचे राजकारण

One day symbolic hunger strike by Bharatiya Janata Party in front of Kolhapur Municipal Corporation administration | सरकार भाजपचेच तरीही आंदोलन का करावे लागते?

सरकार भाजपचेच तरीही आंदोलन का करावे लागते?

कोल्हापूर : कोल्हापूर शहराचे बकालीकरण करणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाविरुद्ध आंदोलनाची सुरुवात म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे मंगळवारी महापालिकेसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. राज्यात आणि देशात भाजपची सत्ता असतानाही कोल्हापुरात एखाद्या प्रश्नाबद्दल आंदोलन करण्याची वेळ आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

साडेतीन वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्द असताना आणि लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप नसतानाही कोल्हापुरातील नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. शहराचे बकालीकरण सुरू आहे. येत्या १५ दिवसांत सर्व समस्यांचे निराकरण न झाल्यास आणि शहराचे बकालीकरण न थांबल्यास तीव्र जनआंदोलन उभे करण्यात येईल, असा इशारा ‘भाजप’चे माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी एका पत्रकाद्वारे दि. २७ मेरोजी दिला होता.

पाणीपुरवठा, आरोग्य, विकासकामे, नगररचना, उद्यान, इस्टेट विभाग अशा नागरिकांशी थेट संबंध असणाऱ्या सर्वच खात्यांच्या कामात कमालीचा ढिसाळपणा आला आहे. थेट पाइपलाइनचे पाणी कोल्हापुरात दोन महिन्यांपूर्वी येऊनही कोणत्या ना कोणत्या भागात रोज पाण्यासाठी आंदोलने होत आहेत. कचरा उठाव आणि प्रक्रिया यांचा कोणताही ताळमेळ होत नसल्याने कचरा उठावात वारंवार अडचणी निर्माण होत असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसत आहेत. गटार, छोटे चॅनेल व नाले गाळाने भरून गेले आहेत. इस्टेट आणि परवाना विभागाच्या अनागोंदीपूर्ण दुर्लक्षामुळे शहरात ठिकठिकाणी अतिक्रमणे, टपऱ्या आणि बेकायदेशीर यात्री निवासांचे पेव फुटले आहे, याकडे ठाणेकर यांनी लक्ष वेधले आहे.

राज्यात महायुतीचे सरकार असताना तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ महायुतीचे असताना शहरात अनेक समस्या जाणवत आहेत आणि त्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना आंदोलन करावे लागत आहे. अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतात; पण तरीही आंदोलन केले जात आहे. यामागे प्रश्नाची तड लावण्यापेक्षा महापालिका निवडणुकीचे राजकारण अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: One day symbolic hunger strike by Bharatiya Janata Party in front of Kolhapur Municipal Corporation administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.