शहरास एक दिवसआड पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:47 AM2018-10-04T00:47:04+5:302018-10-04T00:47:08+5:30
भारत चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : यंदा चांगला पाऊस झाला असून, जिल्ह्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. पंचगंगा नदी बारमाही वाहत आहे. पाण्याची कसलीही टंचाई नाही. तरीही केवळ अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराचा परिणाम म्हणून शहरवासीयांना यापुढे ‘एक दिवसआड’ पाणी पुरवठ्याला सामोरे जावे लागणार आहे. पाणीवाटपाचे नियोजन फसल्यामुळे त्यातून योग्य मार्ग काढण्याऐवजी चक्क ‘एक दिवसआड’ पाणीपुरवठ्याचा पर्याय समोर आणल्यामुळे त्यावर वादविवाद होण्याची दाट शक्यता आहे.
कोल्हापूर शहरातील काही भागांत गेल्या पाच-सहा महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात तीन ठिकाणी संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करून प्रशासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले. स्थायी समितीच्या सभेत जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांना जाब विचारला गेला. तसेच पाणीपुरवठ्यात तातडीने सुधारणा करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या. मात्र प्रशासनाने आपल्या चुकांवर पांघरूण घालून शहरवासीयांनाच ‘एक दिवसआड’ पाणीपुरवठा करण्याचा विचार सुरू केला आहे. ज्या भागात पाण्याचा प्रश्न आहे, तेथील भौगोलिक परिस्थिती, पाण्याची वेळ आणि पाणी न मिळण्याची कारणे शोधण्याचे काम अधिकाºयांनी करायला पाहिजे होते. मात्र तसे न करता थेट ‘एक दिवसआड’ पाणीपुरवठा करण्याकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. तसा प्रस्ताव लवकरच महासभेकडे मंजुरीकरिता पाठविला जाणार आहे.
जिल्ह्यातील धरणे भरली आहेत. नदीत पुरेसे पाणी वाहत आहे. पाण्याची कसलीच टंचाई नाही. पाणी मुबलक असताना ‘एक दिवसआड’चा प्रस्ताव वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. चुका अधिकारी करीत आहेत आणि त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना का? असा सवाल या निमित्ताने तयार झाला आहे.अधिकाºयांनी पाणीपुरवठ्यातील चुका, दोष, उणिवा शोधून त्यांवर पर्याय शोधावेत आणि नागरिकांना किमान चार तास पण पुरेशा दाबाने पाणी द्यावे, अशी मागणी नगरसेवकांतून केली जात आहे. काही नगरसेवकांच्या मते ‘एक दिवसआड’मुळे लोकांना पाण्याचा जपून वापर करण्याची सवय लागेल. त्यामुळे तसा कार्यक्रम जाहीर करायला हरकत नाही; पण त्यानंतर तरी पाणीपुरवठा व्यवस्थित होणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जातो.
प्रशासनाच्या प्रस्तावावर नगरसेवकांत दोन मतप्रवाह आहेत. आंदोलन केले की पाणीपुरवठा सुरळीत होतो. मग ‘एक दिवसआड’चा पर्याय कशाला पाहिजे, अशी विचारणा साईक्स परिसरातील नगरसेवक संजय मोहिते यांनी केली आहे; तर मंगळवार पेठ परिसरातील नगरसेवक संभाजी जाधव यांनी उपनगरांची संख्या वाढली आहे, त्यांना पाणी द्यायचे असेल तर एक दिवसआड पाणीपुरवठा केल्यास सर्वांना मुबलक पाणी मिळेल, असे सांगितले. अनेक घरांत दोन दिवसांचे पाणी साठवून ठेवण्याची सोय नाही. त्यांची गैरसोय होणार आहे.
नगरसेवकांत भांडणे लावण्याचा प्रयत्न
पाणीपुरवठा विभागातील अधिकारी जेव्हा नियोजनात कमी पडतात, पाणीपुरवठा सुरळीत करायला कमी पडतात, तेव्हा हेच अधिकारी नगरसेवकांत भांडणे लावण्याचा प्रयत्न करतात, असा काहींचा आक्षेप आहे. चुकीचा माहिती देऊन नगरसेवकांची दिशाभूल केली जाते. नगरसेवक भांडत बसतात आणि अधिकारी नामानिराळे होतात असा अनुभव आहे, असे नगरसेवक सांगतात.