म्युकरमायक्रोसिसमुळे एक डोळा निकामी, जगणे झाले मुश्किल; चिपरीतील घोलप कुटुंबीयांच्या मदतीला धावला मराठा समाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 12:43 PM2022-01-03T12:43:50+5:302022-01-03T12:51:59+5:30
घोलप कुटुंबियांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी चिपरी येथील मराठा समाजाने उचलून माणुसकीचा आधार दिला आहे.
जयसिंगपूर : चिपरी (ता. शिरोळ) येथील चंद्रकांत घोलप यांचा कोरोनामध्ये म्युकरमायक्रोसिसमुळे एक डोळा निकामी झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा गाडा ओढणे मुश्किलीचे बनले होते. या परिस्थितीचा विचार करून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी चिपरी येथील मराठा समाजाने उचलून माणुसकीचा आधार दिला आहे.
घोलप यांचा मुलगा श्रीतेज (इयत्ता सातवी) व मुलगी संस्कृती (इयत्ता चौथी) या दोघांच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी मराठा समाजाने घेतली आहे. ॲड. विनोद जगदाळे यांनी पुढाकार घेऊन चंद्रकांत घोलप यांच्या कुटुंबाला आधार दिला.
यावेळी घोलप कुटुंबीयास आर्थिक मदत देण्यात आली. याप्रसंगी मनोज राजगीरे, किशोर राजगीरे, सुनील पोवार, उमेश पोवार, विशाल पोवार, मोहन पांडव, प्रवीण जगदाळे, विक्रांत भोसले, प्रदीप सूर्यवंशी, युवराज जगदाळे, अरुण जगदाळे यांच्यासह समाजातील पदाधिकारी उपस्थित होते. या मदतीमुळे घोलप कुटुंबीयांना आधार मिळाला आहे.