‘एक कुटुंब, एक नोकरी’ उपक्रम गुंडाळणार
By admin | Published: December 1, 2015 12:27 AM2015-12-01T00:27:38+5:302015-12-01T00:36:47+5:30
निधीला लागला ब्रेक : केंद्राची ग्रामीण कौशल्य योजना येणार; प्रशिक्षण संस्थांच्या ५० लाखांसाठी पाठपुरावा
भीमगोंडा देसाई -कोल्हापूर -राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत सुरू असलेला ‘एक कुटुंब, एक नोकरी’ हा उपक्रम गुंडाळण्यात येणार आहे. केंद्र सरकार ‘दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना’ सुरू करणार आहे. त्यामुळे जीवन्नोती अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या निधीला ‘ब्रेक’ लागला आहे. प्रशिक्षण संस्थांना देय असलेले ५० लाख रुपये मिळावेत, यासाठी ग्रामीण विकास यंत्रणा शासनाकडे पाठपुरावा करत आहे. मात्र, निधीच मिळाला नसल्यामुळे सर्व उपक्रम बंद आहेत. परिणामी ही योजना बंद होणार असल्याची शक्यता ठळक झाली आहे.
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचे जीवनमान उंचाविण्यासाठी २०१३-१४ पासून हा उपक्रम सुरू करण्यात आला. यासाठी मागणी केलेल्या निधीपैकी केंद्र सरकारकडून ७५ टक्के, तर राज्य शासनाकडून २५ टक्के निधी दिला जात होता. जिल्हा परिषदेतील ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रशासनाकडून योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. योजनेतील ‘एक कुटुंब, एक नोकरी’ या उपक्रमातून आठवी पास-नापास, आयटीआय, बारावी पास-नापास विद्यार्थ्यांना निवडलेल्या ट्रेंडचे ३० ते ४५ दिवसांपर्यंत तालुकास्तरावरच मोफत प्रशिक्षण दिले जात होते. प्रशिक्षित बेरोजगारांना मनुष्यबळ मागणी असलेल्या कंपनीच्या प्रतिनिधींना बोलावून मुलाखतीद्वारे नोकरी दिली जात होती. पहिल्या वर्षी जिल्ह्यासाठी शासनाकडून १२० चे उद्दिष्ट आले होते; पण जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने व्यापक नियोजन करून प्रभावी कामगिरी केल्यामुळे १०९५ उमेदवारांना प्रशिक्षण व किमान कौशल्य देऊन नोकरी मिळवून दिली.
सन २०१४-१५ वर्षात १८ ते ३५ या वयोगटांतील दारिद्र्यरेषेखालील पाच हजार पात्र बेरोजगारांना नोकरी देण्याचे नियोजन केले. प्रत्येक ग्रामपंचायतीने कमीत कमी दहा दारिद्र्यरेषेखालील बेरोजगारांचे अर्ज घेतले. त्यानुसार तालुकानिहाय उद्दिष्ट्य देऊन सुमारे २५ हजार ९०० अर्ज संकलित केले. चांगला प्रतिसाद मिळाल्याने पाच हजार बेरोजगारांना नोकरी देण्याचे नियोजन केले. पात्र बेरोजगारांना प्रशिक्षण देण्यासाठी जिल्ह्यातील ११ स्वयंसेवी संस्थांची निवड केली. पहिल्या टप्प्यात उमेदवारांना प्रशिक्षणही देण्यात आले; परंतु, या आर्थिक वर्षात निधी आला नाही. त्यामुळे प्रशिक्षणही अर्धवट राहिले. प्रशिक्षण दिलेल्या संस्थांना ५० लाख रुपये देय आहे. संस्थाचालक प्रशिक्षण दिलेल्यांचे पैसे कधी मिळणार, तर निवडलेले बेरोजगार नोकरी कधी मिळणार, याच्या प्रतीक्षेत आहेत
नोकरीचे स्वप्न भंगणार..
कोल्हापूर, गडहिंग्लजसह विविध औद्योगिक वसाहतींमध्ये विविध कंपन्यांमध्ये विविध पदांच्या ८ हजार ४८० जणांची आवश्यकता असल्याचे ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वी केलेल्या सर्व्हेतून पुढे आले. त्यानुसार ‘एक कुटुंब, एक नोकरी’ उपक्रमातून नोकरी देण्यासाठी तालुकानिहाय पात्र बेरोजगारांची निवड केली होती. उपक्रमासाठी निधी न आल्याने निवड केलेल्या बेरोजगारांचेही नोकरीचे स्वप्न भंगले आहे.
ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत ‘एक कुटुंब, एक नोकरी’ या उपक्रमासाठी यंदाच्या वर्षासाठी दीड कोटीचा निधी मिळावा, यासाठी शासनाकडे प्रस्ताव दिला आहे. निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. पुरेसा निधी मिळालेला नाही. यंदा केंद्र सरकार दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबविण्याच्या हालचाली करत आहेत.
- अविनाश सुभेदार,
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी .