महाबळेश्वर-प्रतापगड घाटरस्त्यावर एकजण दरीत कोसळला! महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना बाहेर काढण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 10:39 PM2022-06-27T22:39:19+5:302022-06-27T22:40:13+5:30
दारावरील कठड्यावरून पाय घसरल्याने ते थेट शंभर फूट खोल दरीत कोसळले.
लोकमत न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : महाबळेश्वर-प्रतापगड मुख्य घाटरस्त्यावर शंभर फूट खोल दरीत कोसळलेल्या संदीप ओमकार नेहते (वय ३३, रा. मध्य प्रदेश, सध्या बावधन, पुणे) या पर्यटकास महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी तीन तासांच्या प्रयत्नाने दरीबाहेर काढले. जखमी नेहते हे माकडाला चिप्स खायला देण्यासाठी गाडीमधून उतरले. दारावरील कठड्यावरून पाय घसरल्याने ते थेट शंभर फूट खोल दरीत कोसळले. ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, संदीप नेहते व कुटुंबीय हरिहरेश्वर (जि. रायगड) येथून महाबळेश्वर पर्यटनास येथील आंबेनळी घाटरस्त्यामार्गे येत असता त्यांना जननी माता मंदिरावरील बाजूस रस्त्यानजीक असलेल्या कठड्यावर काही माकडे दिसली. संदीप हे गाडीमधून उतरून या माकडांना चिप्स खायला देण्यासाठी दरीवर असलेल्या कठड्यावर उभे राहिले. मात्र त्यांचा पाय घसरल्याने ते थेट शंभर फूट खोल दरीमध्ये कोसळले. याबाबतची माहिती महाबळेश्वर पोलीस व महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवानांना समजताच तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संततधार पावसात तीन तासांच्या प्रयत्नानंतर महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी नेहते यांना सुखरूप दरीबाहेर काढले. येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना अधिक उपचारांसाठी जिल्हा रुग्णालय सातारा येथे पाठविण्यात आले.
या मोहिमेत महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनील भाटिया, माजी नगरसेवक कुमार शिंदे, संतोष शिंदे, सतीश ओंबळे, अमित कोळी, जयवंत बिरामणे, सुनील केळगणे, बाळासाहेब शिंदे, सौरभ साळेकर, अमित झाडे, सौरभ गोळे, अनिकेत वागदरे, सूर्यकांत शिंदे यांच्यासह महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली साहायक पोलीस फौजदार डी. एच. पावरा, संदीप मांढरे, सलीम सय्यद, जगताप आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.