एका हाकेत, सारे कोल्हापुरात

By admin | Published: October 16, 2016 12:27 AM2016-10-16T00:27:06+5:302016-10-16T00:27:06+5:30

शिरोळकरांचेही मोर्चात एकीचे दर्शन : बाजारपेठात शुकशुकाट, ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत

One Haqqat, all in Kolhapur | एका हाकेत, सारे कोल्हापुरात

एका हाकेत, सारे कोल्हापुरात

Next


जयसिंगपूर : कोल्हापूर येथील मराठा क्रांती मूक मोर्चात शनिवारी शिरोळ तालुक्यासह सीमा भागातील समाजबांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला. मोर्चाच्या निमित्ताने तालुक्यातील अनेक गावे माणसांच्या वर्दळाविना ओस पडली. दिवसभर मुख्य बाजारपेठ बंद असल्याने शुकशुकाट होता. वाहनांचा प्रचंड ताफा, महिला, युवती तसेच युवकांचा समावेश असलेल्या भगवा... मराठामय वादळाचा शिरोळ ते कोल्हापूर असा प्रवास एकीचे दर्शन देणारा ठरला.
मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने शनिवारी जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाडसह परिसरातून सकाळी सात वाजल्यापासून कोल्हापूरच्या मोर्चासाठी वाहने जात होती. वाहनात शेकडो रणरागिणी, दुचाकी वाहनावर भगवे ध्वज, टोपी परिधान केलेले युवक मोर्चासाठी रवाना झाले. प्रत्येक वाहनांमध्ये केळी, भडंग, पाण्याच्या बाटल्या, भोजन अशी व्यवस्था करण्यात आली होती. सर्वांनी भगव्या टोप्या परिधान केल्याने शिवमय वातावरण निर्माण झाले होते. कोल्हापूरच्या मोर्चाला जाणाऱ्या मराठा समाजबांधवांच्या सेवेसाठी शिरोळ येथील शिवाजी चौक, कचेरी परिसर, चौंडेश्वरी सूतगिरणी, नांदणी नाका आदी माार्गावर चहा, नाष्टा, पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यासाठी मुस्लिम समाजबांधवांनी छोटे-छोटे स्टॉल लावले होते. ट्रक, टेम्पो, स्कूलबस, दुचाकी वाहनांचा ताफा मोर्चासाठी मोठ्या संख्येने गेला होता. सांगली-कोल्हापूर महामार्गावर शिरोळ सकल मराठा संयोजन समितीच्या वतीने वैद्यकीय पथक, रुग्णसेविकेची सोय केली होती. मोर्चाच्या निमित्ताने तालुक्यात अघोषित बंद पाळण्यात आला. नागरिकांनी स्वयंघोषित सुटी घेतल्याने गावातील बाजारपेठात शुकशुकाट पसरला होता. सायंकाळी काही व्यावसायिकांनी दुकाने उघडली. (प्रतिनिधी)

दर्शन घेऊन मोर्चास रवाना
जयसिंगपूर शहरात मराठा मंडळ भवनजवळ वाहनांची सोय करण्यात आली होती. सकाळी सात वाजल्यापासून मिळेल त्या वाहनाने मोर्चासाठी लोक जात होते. शिरोळ येथील छत्रपती शिवाजी चौक येथे ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्या तख्तचे दर्शन घेऊन मोर्चासाठी लोक रवाना झाले. कुरुंदवाडमधूनही शिवमय वातावरणात लोक कोल्हापूरला मार्गस्थ झाले.
...अन् मोर्चात सहभाग
मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व समाजबांधवांबरोबर शाळा, महाविद्यालय, सेवा संस्था, दत्त, गुरुदत्त साखर कारखाने, औद्योगिक वसाहत यांनी पाठिंबा दर्शवित मराठा समाजाच्या मागण्या रास्त असून आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्या होत्या. कोल्हापूरच्या मोर्चालाही शिरोळ तालुक्यातील मराठा समाजबांधवांबरोबर इतर सर्व समाजातील नागरिकांनी सहभाग नोंदविला होता.















 

Web Title: One Haqqat, all in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.