विनयभंगप्रकरणी एकास सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:31 AM2021-06-16T04:31:59+5:302021-06-16T04:31:59+5:30
संस्थात्मक अलगीकरण केंद्रातील प्रकार लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील संस्थात्मक अलगीकरण केंद्रात अंघोळ करीत असलेल्या युवतीस डोकावून पाहत ...
संस्थात्मक अलगीकरण केंद्रातील प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील संस्थात्मक अलगीकरण केंद्रात अंघोळ करीत असलेल्या युवतीस डोकावून पाहत विनयभंग केल्याप्रकरणी एकास न्यायालयाने दोषी ठरवले. त्यास एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड ठोठावला. अमिर मरमसाब शेख (वय २१, कोल्हापूर नाका) असे त्याचे नाव आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.एस.भंडारी यांनी शिक्षा सुनावली. हा प्रकार १६ मे २०२० ला घडला होता.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाट्यगृह चौकातील मुलींच्या वसतिगृह इमारतीत संस्थात्मक अलगीकरण केंद्र सुरू केले होते. त्यावेळी अमिर हा कर्नाटक राज्यातून, तर पीडित युवती व तिचे कुटुंब सांगोला (जि.सोलापूर) येथून आल्याने त्यांना त्याच अलगीकरण केंद्रात ठेवले होते. पीडित युवती ही अंघोळ करण्यासाठी गेली असता अमिर हा छप्पर नसलेल्या स्नानगृहाच्या भिंतीवर चढून डोकावून पाहत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी काही नागरिकांनी त्याला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानुसार त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, कोरोनाच्या महामारीत हा गंभीर प्रकार असल्याने त्याची न्यायालयाने दखल घेत वर्षभरातच सुनावणी पूर्ण करून शिक्षा सुनावली. सुनावणीदरम्यान युवती, तिची आई व अन्य सात जणांचे जबाब नोंदविण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षी पुरावे व सरकारी अभियोक्ता एम.डी.आवारीवार यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भंडारी यांनी वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. तसेच जिल्हा विधिसेवा प्राधिकरण यांनी पीडित युवतीला नुकसानभरपाई द्यावी, असेही न्यायालयाने सांगितले.
फोटो ओळी
१४०६२०२१-आयसीएच-०२ - अमिर शेख