शंभर कोटी रस्त्यांची कामे अपूर्ण, आपचा आरोप; दर्जा तपासण्यासाठी मंगळवारी अधिकाऱ्यांसोबत पंचनामा करणार
By संदीप आडनाईक | Published: June 15, 2024 03:40 PM2024-06-15T15:40:23+5:302024-06-15T15:41:03+5:30
रस्ते कामाचा दर्जा तपासण्यासाठी ४६ वेगवेगळ्या चाचण्यांचीही नोंद महापालिकेकडे नसल्याचा आरोप करुन दर्जा तपासण्यासाठी मंगळवारी गोखले कॉलेज येथे अधिकाऱ्यांसोबत पंचनामा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती महाअभियानातंर्गत कोल्हापूरातील १६ रस्त्यांसाठी तब्बल शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे, मात्र पाच रस्ते पूर्ण झाल्याचा दावा करणाऱ्या महापालिकेकडून ही कामे अपूर्ण असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने शनिवारी पत्रकार परिषदेचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला. दरम्यान, रस्ते कामाचा दर्जा तपासण्यासाठी ४६ वेगवेगळ्या चाचण्यांचीही नोंद महापालिकेकडे नसल्याचा आरोप करुन दर्जा तपासण्यासाठी मंगळवारी गोखले कॉलेज येथे अधिकाऱ्यांसोबत पंचनामा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
कोल्हापुरातील १६ रस्त्यांच्या कामाची वर्कऑर्डर गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात एवरेस्ट कंपनीला दिली. चार महिने उशिराने गाजावाजा करत पालकमंत्र्यांच्या हस्ते या कामाचा आरंभ केला. महापालिकेने यातील पाच रस्ते पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. स्वत: पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही याचा पुनरुच्चार जिल्हाधिकारी कार्यालयात केला. परंतु यातील एकही रस्ता अंदाजपत्रकाप्रमाणे पूर्ण झाला नसल्याचा आरोप आपने केला आहे. कोल्हापूरातील रस्ते अंदाजपत्रक आणि रोडक्रॉस सेक्शन डिझाईनप्रमाणे केलेले नाही. राजारामपुरी माउली चौक ते गोखले कॉलेज या रस्त्यावर बीटूमिनस काँक्रेट ३० मिमीच्या लेअर टाकलेला नाही. वेट मिक्स मॅकेडम, डाव्या बाजूस आरसीसी पडदी चॅनेल, उजव्या बाजूस सिमेंट क्राँक्रेट पाईप टाकण्यासाठी तब्बल तीन कोटी रुपयांचे काम प्रत्यक्षात झालेच नसल्याचा आराेपही देसाई यांनी केला. रस्ते कामाचा दर्जा राखण्यासाठी व्हिजिलन्स ॲन्ड क्वालिटी सर्कल कंट्रोलच्या मानक नियमावलीचा अवलंब करुन त्रयस्थ तांत्रिक परीक्षण करायचे आहे. या चाचण्यांसाठी ६८ लाख रुपये देण्यात येणार आहेत. एका रस्त्यासाठी ४६ वेगवेगळ्या चाचण्या कराव्या लागतात. परंतु पावसाळा सुरु झाला तरी यासंदर्भातील कोणताच अहवाल महापालिकेने जाहीर केलेला नाही असाही आरोप देसाई यांनी केला. या रस्त्याचे काम दिलेल्या कंपनीने उपठेकेदार नेमल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. या परिषदेला शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, मयूर भोसले, विजय हेगडे, मोईन मोकाशी, प्रथमेश सूर्यवंशी, अमरसिंह दळवी उपस्थित होते.