फेब्रुवारीअखेरीस शंभर ई-बसेस कोल्हापुरात, खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 02:23 PM2023-12-09T14:23:58+5:302023-12-09T14:24:16+5:30
तत्पूर्वी पायाभूत सुविधांची निर्मिती करणार
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागास (केएमटी) मंजूर झालेल्या १०० ई-बसेस फेब्रुवारीअखेरीस कोल्हापुरात आणण्यासाठी प्रयत्नशील असून तत्पूर्वी पायाभूत सोयी-सुविधांच्या पूर्ततेसाठी ३८ कोटी रुपयांच्या प्रस्तावांचा पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
ई-बसेससाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सोयी-सुविधांची उभारणी आणि पूर्ततेसाठी खासदार महाडिक यांनी शुक्रवारी महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विद्युतीकरणाचा २६ कोटींचा आणि पायाभूत सुविधांसाठी १२ कोटींचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे पाठविला आहे, त्याचा आपण पाठपुरावा करू, असे खासदार महाडिक यांनी बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे नव्या वर्षात कोल्हापूरवासीयांना १०० ई-बसेसची गिफ्ट मिळण्याची दाट शक्यता आहे.
केएमटीची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे लक्षात घेऊन आणि नागरिकांना सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा मिळावी यासाठी खासदार महाडिक यांनी केंद्र सरकारकडे कोल्हापूर शहरासाठी १०० ई-बसेसची मागणी केली होती. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे ही मागणी मान्य झाली.
नव्या ई-बसेससाठी अत्यावश्यक पायाभूत सुविधांची उभारणी करणे आवश्यक आहे. त्यामध्ये ई -बसेसच्या चार्जिंगसाठी स्वतंत्र विद्युत यंत्रणा, चार्जिंग स्टेशन, प्रशासकीय इमारत, कर्मचाऱ्यांसाठी विश्रांती स्थान, पार्किंग व्यवस्था अशा कामांचा समावेश आहे. पुईखडी ते केएमटी वर्कशॉप या साडेआठ किलोमीटर लांबीच्या मार्गावर ३३ केव्ही क्षमतेची स्वतंत्र विद्युत वाहिनी टाकणे गरजेचे आहे. तसेच केएमटी वर्कशॉपमध्ये ३५ चार्जिंग स्टेशन्स उभारली जातील. अशा विद्युतीकरणाच्या कामासाठी २६ कोटी रुपये खर्च येणार आहे. शिवाय अन्य पायाभूत सुविधांसाठी १२ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या दोन्ही खर्चांचे प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे पाठविले आहेत, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.
१०० ई-बसेसचे शहरवासीयांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रसंगी जिल्हा नियोजन मंडळ आणि राज्य शासन यांच्याकडेही निधीसाठी पाठपुरावा केला जाईल, असेही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले. यावेळी चर्चेत अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता हर्षजित घाटगे, केएमटीचे सहायक अभियंता सुरेश पाटील, अधीक्षक पी. एन. गुरव, विद्युत विभागाचे सहायक अभियंता अमित दळवी, दीपक पाटील, नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे, वैभव माने यांनी भाग घेतला.