यंदा सर्वच शाळांचा निकाल शंभर टक्के !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:18 AM2021-06-02T04:18:48+5:302021-06-02T04:18:48+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय शिक्षण विभागाने दहावीची परीक्षा रद्द केली. इयत्ता नववीचे अंतिम गुण आणि दहावीतील अंतर्गत परीक्षांच्या ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय शिक्षण विभागाने दहावीची परीक्षा रद्द केली. इयत्ता नववीचे अंतिम गुण आणि दहावीतील अंतर्गत परीक्षांच्या गुणांवर मूल्यमापन करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, कोरोनामुळे जिल्ह्यातील ३० ते ३५ टक्के शाळांमध्ये अंतर्गत तोंडी, लेखी परीक्षाच झालेल्या नाहीत. त्यामुळे मूल्यमापन समान पद्धतीने कसे होणार याबाबत प्रश्न आहे. सद्य स्थितीमध्ये या परीक्षा कशा घ्यावयाच्या आणि विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे हा प्रश्न शिक्षकांसमोर उभारला आहे. अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार आहे, तर मग दहावीची परीक्षा घेण्यास काय हरकत होती असा सवाल पालक आणि विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे. निकाल लावण्याच्या प्रक्रियेतील शिक्षक, मुख्याध्यापकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शासनाने जाहीर केलेल्या पद्धतीप्रमाणे मूल्यमापन झाल्यास सर्वच शाळांचा निकाल शंभर टक्के लागणार आहे.
चौकट
असे असेल नवे सूत्र
शासनाने जाहीर केल्याप्रमाणे ५०-३०-२० असा दहावी निकालाचा नवा फॉर्म्युला असणार आहे. याअंतर्गत इयत्ता नववीमध्ये मिळालेल्या गुणांचे ५० टक्के गुण, वर्षभरात दहावीच्या विविध लेखी परीक्षांमध्ये मिळणाऱ्या गुणांचे ३० गुणांकनाने लेखी आणि २० गुणांकांनी तोंडी परीक्षेच्या गुणांची बेरीज केली जाणार असल्याची माहिती शासनाने दिली आहे.
चौकट
आयटीआय, तंत्रनिकेतनला निर्णयाची प्रतीक्षा
अकरावीतील प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र, ही सीईटी ऐच्छिक आहे. दहावीच्या निकालावर आयटीआय, तंत्रनिकेतनमधील प्रवेश होतात. आयटीआयला तंत्रशिक्षण संचालनालयाच्या, तर तंत्रनिकेतनला व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा लागली आहे.
शिक्षणतज्ज्ञ काय म्हणतात?
कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी पूर्णवेळ शाळा भरलेल्या नाहीत. त्यामुळे नववी, दहावीतील परीक्षांबाबतची माहिती बहुतांश शाळांमध्ये अद्ययावत नाही. विविध शिक्षण मंडळांनी नववीच्या निकालासाठी वेगळी प्रक्रिया राबविली आहे. त्यामुळे निकाल लावताना एकसारखेपणा राहणार नाही. एकूणच निकालाबाबत सध्या गोंधळाची स्थिती आहे.
-डॉ. बी. एम. हिर्डेकर, शिक्षणतज्ज्ञ
विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेला हा निर्णय योग्य आहे. याशिवाय दुसरा पर्याय नाही.
-आय. सी. शेख, प्राचार्य, डाएट
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यामुळे नववीतील अंतिम आणि दहावीतील अंतर्गत गुणांवर मूल्यमापन करण्याचा निर्णय चांगला आहे.
-डी. एस. पोवार, शिक्षण निरीक्षक
पालक काय म्हणतात?
कोरोनामुळे नववीमध्ये असताना या विद्यार्थ्यांचे वर्ग भरले नाहीत. त्यामुळे नववीच्या गुणांचा दहावीच्या मूल्यमापनासाठी आधार घेणे योग्य वाटत नाही. परीक्षा झाली असती, तर बरे झाले असते. पण, कोरोनामुळे ते शक्य नाही.
-संजय मांडवकर, कनाननगर.
सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता आलेले नाही. ऑनलाईन शिक्षण झाले, पण ते देखील परिणामकारकपणे झालेले नाही. त्यामुळे नववी, दहावीतील गुणांच्या आधारे कसे मूल्यमापन होणार याबाबत काहीच समजेना झाले आहे.
-अर्चना पुरेकर, शाहुपुरी.
विद्यार्थ्यांमध्ये संमिश्र वातावरण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य आहे. मात्र, ऑनलाईन स्वरूपात परीक्षा घेऊन आमचे मूल्यांकन केले असते, तर ते पुढील शिक्षणासाठी आम्हाला बरे झाले असते.
-नैनेश जंगले, प्रियदर्शनी कॉलनी.
दहावीचा निकाल लावताना इयत्ता नववीतील गुणांवर ५० टक्के गुण दिले जाणार आहेत. त्यामुळे आम्ही पास होणारच यात काही शंका नाही. पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कोणती प्रक्रिया राबविली जाणार हे शासनाने लवकर जाहीर करावे.
-पूर्वा मोहिते, कसबा बावडा.
===Photopath===
010621\01kol_1_01062021_5.jpg
===Caption===
डमी (०१०६२०२१-कोल-स्टार ७६७ डमी)