बस बंद असूनही केएमटीचा शंभर टक्के पगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:27 AM2021-08-12T04:27:06+5:302021-08-12T04:27:06+5:30
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ७५ बस बंद असून देखील केएमटी कर्मचाऱ्यांचा शंभर टक्के पगार होत आहे. महापालिका प्रशासनाने ...
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ७५ बस बंद असून देखील केएमटी कर्मचाऱ्यांचा शंभर टक्के पगार होत आहे. महापालिका प्रशासनाने त्यांच्या पगाराची जबाबदारी स्वीकारली असल्याने कर्मचारीही कोरोना ड्यूटी आनंदाने करत आहेत. सध्या शहरात केएमटीच्या २५ बस विविध मार्गांवर धावत आहेत.
कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन झाल्याचा तसेच कडक निर्बंध लादल्याचा मोठा फटका केएमटी प्रशासनास बसला. केएमटीच्या बस बंद ठेवाव्या लागल्या. कर्मचाऱ्यांचा पगार होणेही मुश्कील झाले; परंतु महानगरपालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना महापालिकडील कोविड प्रतिबंधक कामात समाविष्ट करून घेतले. एवढेच नाही तर त्यांचा प्रत्येक महिन्याचा पगारही वेळेवर केला. त्यामुळे केएमटीचे सर्व कर्मचारी कोविड सेंटर, लसीकरण केंद्र, ऑक्सिजन पुरवठा पथक, स्वॅब तपासणी पथकात काम करत आहेत.
सध्या केएमटीच्या २५ बस विविध मार्गावर धावत आहेत, तर दहा बसच या कोविडच्या कामाकरिता सोडण्यात आल्या आहेत. प्रवासी संख्याही कमी असल्यामुळे पन्नास टक्के मर्यादेत प्रवासी वाहतूक सुरू आहे. जसे प्रवासी वाढतील तशा बस सोडण्यात येतील, असे केएमटीकडून सांगण्यात आले.