गडहिंग्लज तालुक्यातील ३ गावांचे शंभर टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:25 AM2021-04-22T04:25:34+5:302021-04-22T04:25:34+5:30
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील वाघराळी, दुगुनवाडी व मांगनूर तर्फ सावतवाडी या तीन गावांचे १०० टक्के कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले. ...
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील वाघराळी, दुगुनवाडी व मांगनूर तर्फ सावतवाडी या तीन गावांचे १०० टक्के कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले.
आजअखेर तालुक्यातील एकूण ८९ पैकी ६ गावात ९५ टक्क्यांहून अधिक तर ९ गावांत ९० टक्क्यांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ३० गावांत ५० टक्क्यांहून अधिक लसीकरण झाले आहे. यमेहट्टी गावात सर्वांत कमी ७.८७ टक्के लसीकरण झाले आहे.
बुधवार (२१) अखेर यमेहट्टी, हिटणी, माद्याळ, हसूरवाडी व शिप्पूर तर्फ आजरा या गावांत केवळ २५ टक्क्यांपर्यंत लसीकरण झाले आहे.
हिडदुगी, ऐनापूर, कडाल, इंचनाळ, हेब्बाळ जलद्याळ, तारेवाडी, बटकणंगले, सांबरे व मुंगूरवाडी या गावांत ९० टक्क्यांहून अधिक लसीकरण झाले आहे.
अर्जुनवाडी, हरळी खुर्द, शिप्पूर तर्फ नेसरी, अरळगुंडी, मासेवाडी, सरोळी या गावांत ९५ टक्क्यांहून अधिक लसीकरण झाले आहे.
आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणातून निश्चित केलेल्या आणि मतदार यादीनुसार निश्चित झालेली ४५ वर्षांच्या पुढील वयोगटांतील व्यक्तींच्या संख्येत तालुक्यात २०९१७ इतकी तफावत आढळून येते.
मुंबई, पुणे व बाहेरच्या अन्य शहरांतून आलेल्या व्यक्तींची नावे मतदार यादीत नसल्याने ही तफावत दिसत असल्याचे स्थानिक प्रशासनाचे मत आहे.
-----------------------
* प्रतिक्रिया
लसीकरणाची मोहीम १०० टक्के यशस्वी होण्यासाठी ग्रामसंस्कार वाहिनीवरून प्रबोधन करणे आवश्यक आहे. शिल्लक लाभार्थ्यांची यादी करून ग्रामदक्षता समित्या आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने लसीकरण वाढविता येईल. तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल, अंगणवाडी व आशासेविका यांनी पात्र लाभार्थ्यांच्या लसीकरणाची जबाबदारी वाटून घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत.
- दिनेश पारगे, तहसीलदार, गडहिंग्लज