मातृभूमी ट्रस्ट घेणार शंभर विद्यार्थी दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:29 AM2021-09-07T04:29:43+5:302021-09-07T04:29:43+5:30
कोल्हापूर : उत्तरेश्वर थाळीच्या माध्यमातून गोरगरिबांना पाच रुपयांत अन्नदान उपक्रम राबविणाऱ्या मातृभूमी चॅरिटेबल ट्रस्टने पुढचे पाऊल म्हणून शंभर होतकरू ...
कोल्हापूर : उत्तरेश्वर थाळीच्या माध्यमातून गोरगरिबांना पाच रुपयांत अन्नदान उपक्रम राबविणाऱ्या मातृभूमी चॅरिटेबल ट्रस्टने पुढचे पाऊल म्हणून शंभर होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिकरीत्या दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
चव्हाण म्हणाले, कोल्हापुरातील असंख्य दातृत्ववान लोकांच्या सहकार्याने अवघ्या पाच रुपयांत गरजवंतांना उत्तरेश्वर थाळीच्या रूपाने अन्नदान मोहीम राबवीत आहोत. यासह पंचगंगा स्मशानभूमीस ४ टन लाकूड दान, लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून तब्बल तीन महिने रोज पाचशे मुलांना आयुर्वेदिक काढा देण्यात आला. महापुराच्या काळात विस्थापित झालेल्या ३०० नागरिकांना चहा, नाश्त्यासह दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था , असे काळानुरूप उपक्रम राबविले जात आहेत. याचाच पुढचा भाग म्हणून ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिकरीत्या दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या शंभर मुलांच्या पालकत्वाची जबाबदारी संस्थेशी संलग्न असलेल्या १०० व्यक्तींना दिली जाणार आहे. हे पालक दर आठवडा किंवा पंधरा दिवसांनी त्या विद्यार्थ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर लक्ष ठेवतील. यातून त्या विद्यार्थ्यांची जडणघडण उत्कृष्ट व्हावी हा या संस्थेचा मानस आहे.
यावेळी युवराज जाधव, योगिता चव्हाण, किरण शिंदे, सम्राट शिर्के आदी उपस्थित होते.