मिरजेत खड्ड्यांमुळे अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 04:10 PM2019-11-14T16:10:19+5:302019-11-14T16:24:58+5:30
मिरजेत गांधी चौक ते बसस्थानक या शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातात दुचाकीस्वाराचा बळी गेला. स्टेशन चौकात ड्रेनेज यंत्रणा खचल्याने लावलेल्या बॅरिकेटस्ला दुचाकी धडकून निवृत्त रेल्वे तिकीट तपासनीस पी. बी. ऊर्फ पायण्णा बाबूराव कोळी (वय ७२, रा. वखारभाग, मिरज) आठ दिवसांपूर्वी जखमी झाले होते. मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला.
मिरज : मिरजेत गांधी चौक ते बसस्थानक या शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातात दुचाकीस्वाराचा बळी गेला. स्टेशन चौकात ड्रेनेज यंत्रणा खचल्याने लावलेल्या बॅरिकेटस्ला दुचाकी धडकून निवृत्त रेल्वे तिकीट तपासनीस पी. बी. ऊर्फ पायण्णा बाबूराव कोळी (वय ७२, रा. वखारभाग, मिरज) आठ दिवसांपूर्वी जखमी झाले होते. मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला.
मिरजेत रस्त्यांच्या दुरवस्थेकडे महापालिकेचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. स्टेशन रस्ता व बसस्थानक चौकात ड्रेनेज यंत्रणा दुरूस्तीसाठी गेले महिनाभर महापालिकेने बॅरिकेटस् लावले आहेत.
मिरज रेल्वेस्थानकात चौकशी खिडकीत प्रवाशांना माहिती देण्याचे काम करणारे निवृत्त तिकीट तपासनीस पी. बी. कोळी आठ दिवसांपूर्वी रात्री दुचाकीवरून घरी परत येत असताना स्टेशन चौकातील बॅरिकेटस्ला धडकून रस्त्यावर पडल्याने डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाले. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना, मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.
राष्ट्रीय महामार्गात समावेश झालेल्या गांधी चौक ते बसस्थानक या मोठ्याप्रमाणात वाहतूक असलेल्या या प्रमुख रस्त्याची पावसाने चाळण झाली आहे. बसस्थानक चौकात रस्त्यावरील विक्रेते, हातगाड्यांच्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी होते.
या चौकात वारंवार ड्रेनेज यंत्रणेची दुरुस्ती करण्यात येत असल्याने रस्त्याच्या मधोमध बॅरिकेटस् लावण्यात आले आहेत. यामुळे स्टेशन चौकात वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. रात्रीच्या अंधारात बॅरिकेटस् न दिसल्याने कोळी यांचा मृत्यू झाला.