कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात गळा आवळून एकाचा खून, संशयितांचा शोध सुरू
By उद्धव गोडसे | Published: September 26, 2024 01:25 PM2024-09-26T13:25:51+5:302024-09-26T13:26:10+5:30
कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानकातील एका दुकानाच्या पायरीवर गळा आवळून तरुणाचा खून केल्याचा प्रकार गुरुवारी (दि. २६) सकाळी उघडकीस आला. ...
कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानकातील एका दुकानाच्या पायरीवर गळा आवळून तरुणाचा खून केल्याचा प्रकार गुरुवारी (दि. २६) सकाळी उघडकीस आला. संदीप रामगोंडा शिरगावे (वय ३५, रा. चिंचवाड, ता. शिरोळ) असे मृताचे नाव असल्याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. संशयितांच्या शोधासाठी शाहूपुरी पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत.
शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एसटी प्रोव्हिजन स्टोअरच्या पायरीवर एक तरुण बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती एसटीच्या अधिका-यांकडून मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, तो मृत झाल्याचे लक्षात आले. जवळ त्याची बॅग होती. गळ्यावर दोरीचे व्रण दिसत असल्याने गळा आवळून त्याचा खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला.
त्याच्याकडे मिळालेल्या एका डायरीत असलेल्या नावावरून पोलिसांनी त्याची ओळख पटवली. त्याचे नाव संदीप शिरगावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सीपीआरमध्ये पाठवण्यात आला.
पोलिसांकडून त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुकानासमोर झोपण्यासाठी झालेल्या वादातून त्याचा गळा आवळला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला.
गडहिंग्लजमध्ये होता मुक्काम
चिंचवाड येथील शिरगावे हा ट्रकचालक होता. दारू पिऊन घरात गोंधळ घालत असल्याने चार महिन्यांपूर्वी त्याची पत्नी आणि मुलगा माहेरी गडहिंग्लज येथे गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून तोदेखील सासुरवाडीत राहत होता, अशी माहिती चिंचवाड येथून मिळाली.