शिरोलीत सिलिंडर स्फोटात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:47 AM2018-06-18T00:47:54+5:302018-06-18T00:47:54+5:30
शिरोली : येथील शिरोली एम. आय. डी. सी.तील ‘काय इंडस्ट्रीयल गॅसेस प्रा. लि.’ कंपनीत कार्बन डायआॅक्साईडच्या सिलिंडरचा स्फोट होऊन एक कामगार ठार, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. विपीनकुमार आर्या (वय ३०, रा. मथुरा, उत्तर प्रदेश) असे ठार झालेल्याचे नाव आहे, तर अमित वंजारे (२९, रा. निगवे), वसंत परीट (४५, रा. मलकापूर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. ही घटना रविवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली.
घटनास्थळ व पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, शिरोली एमआयडीसीमध्ये काय इंडस्ट्रीयल गॅसेस नावाची कंपनी आहे. येथे आॅक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायआॅक्साईड, अॅरगॉन, डीए, आदी प्रकारचे वायू सिलिंडर भरून विविध कंपन्यांना पुरवठा केला जातो. कंपनीचे मालक निरज चंद्रा यांची सातारा येथेही नायट्रो आॅक्सिजन नावाची कंपनी आहे. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास सातारा येथून कार्बनडायक्साईडचे ३६ सिलेंडर घेऊन टेम्पो एमआयडीसीमध्ये आला. हे सिलेंडर उतरण्याचे काम विपीनकुमार आर्या, अमित वंजारे आणि वसंत परिट हे करीत होते. सिलेंडर उतरत असताना यातील कार्बनडायक्साईडने भरलेले सिलेंडर फुटून मोठा स्फोट झाला. या स्फोटात विपीनकुमार आर्या जागीच ठार झाला. तर अमित वंजारे व वसंत परिट गंभीर जखमी झाले. यातील परिट याच्यावर सीपीआरमध्ये तर वंजारे याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूला असलेल्या कंपनीतील कामगारही हादरून गेले. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, उपाधीक्षक आर. आर. पाटील, तहसीलदार वैशाली राजमाने, शिरोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे आणि बॉम्ब शोध पथकाने भेट दिली.
मोठा अनर्थ टळला...
काय इंडस्ट्रीयल गॅसेसमध्ये आॅक्सीजन, नायट्रोजन, कार्बनडायक्साईड, अॅरगॉन, डीए , आदी प्रकारचे वायूने भरलेल्या पाचशेहून अधिक टाक्या आहेत. तर सुमारे पंधरा कामगार कामावर होते. या स्फोटानंतर लगेचच पसरलेला वायू धुवून काढण्यात आला. अन्यथा मोठा भडका उडाला असता. कार्बनडायक्साईडचे सिलेंडर गाडीतून उतरवून उभे ठेवले होते. ते सिलेंडर नऊ किलोचे होते. ते सिलेंडर पडले आणि फुटुन स्फोट झाला; पण इतर सिलेंडरही अनेकदा पडतात, त्यावेळी स्फोट होत नाही. ते सिलेंडर जुने होते. याचा वापर होऊन ते जीर्ण झालेले असल्याने खाली पडल्यावर फुटल्याचे तेथील कामगारांनी सांगितले.
विपीनकुमार सहा वर्षांपासून कामास
स्फोटात ठार झालेला विपीनकुमार आर्या हा उत्तर प्रदेशमधील मथुरा अलिबागचा, पण गेली सहा वर्षे तो काय गॅसेस कंपनीतच कामाला होता. तो तिथेच कंपनीच्या खोलीत राहात होता. या स्फोटात तो सापडल्यावर त्याच्या शरीराचे तुकडे झाले होते.