हुपरी येथे मारामारीत एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:52 AM2020-12-11T04:52:33+5:302020-12-11T04:52:33+5:30
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, राजाराम व सयाजी तांबे या भावामध्ये गेल्या काही वर्षांपासून शेतजमिनीच्या कारणातून वाद सुरू आहे. ...
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, राजाराम व सयाजी तांबे या भावामध्ये गेल्या काही वर्षांपासून शेतजमिनीच्या कारणातून वाद सुरू आहे. याप्रकरणी न्यायालयात खटलाही सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणाचा निकाल राजाराम यांच्या बाजूने लागल्याने सयाजी व राजाराम यांच्यात वारंवार वादावादीचे प्रकार घडत आहेत. शनिवारी (ता. ५)याच कारणावरून पुन्हा वाद झाला. त्याचे पर्यावसान मारामारीत झाले. यामध्ये दोन्ही बाजूंनी लोखंडी खोरे, काठी, दगड याचा सर्रास वापर करण्यात आला. त्यामध्ये दोन्हीही बाजूचे सयाजी, पत्नी नंदाताई व मुलगा संदीप तसेच राजाराम त्यांची पत्नी सुनीता व मुलगा चंद्रकांत हे सुद्धा जखमी झाले होते. राजाराम यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने त्यांच्यावर कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान बुधवारी (ता.९)रात्री उशिराने त्यांचा मृत्यू झाला. या मारामारी प्रकरणी हुपरी पोलिसांत परस्पर तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. राजाराम यांचा मृत्यू झाल्याची नोंद होताच सयाजी संतराम तांबे, नंदाताई सयाजी तांबे व संदीप सयाजी तांबे यांच्यावर हुपरी पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यापैकी सयाजी व नंदाताई या दोघांना अटक करण्यात आली असून जखमी संदीप हा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याने अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.
--------::---------