ताटात रस्सा सांडल्याच्या कारणावरुन चाकूहल्ला, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू; तिघांवर खुनाचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 12:06 PM2022-05-21T12:06:18+5:302022-05-21T12:38:21+5:30
औरवाडमध्ये तणावपूर्ण वातावरण असल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
कुरुंदवाड / बुबनाळ : ताटात रस्सा सांडल्याच्या कारणातून वाद होऊन दोघांवर चाकूहल्ला झाल्याची घटना शेडशाळ (ता. शिरोळ) येथे घडली होती. यात दोघे गंभीर जखमी झाले होते. यातील ओंकार माने (रा. औरवाड ता. शिरोळ) याचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी तीघेजण अटकेत असून जखमीचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर औरवाडमध्ये पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
ओंकार शिकलगार, प्रकाश शिकलगार (दोघे रा. शिकलगार वसाहत, कुरुंदवाड, ता. शिरोळ), कुलदीप संकपाळ (रा.शेडशाळ, ता. शिरोळ) या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि.२४) घडली होती.
शेडशाळ येथील हॉटेल समाधान ढाबा येथे संशयित आरोपी शिकलगार व संकपाळ हे तिघे व जखमी ओंकार माने व अमीनमहंमद पटेल हे जेवायला बसले असताना एकमेकाला धक्का लागल्याने ताटात रस्सा पडल्याने वाद झाला.
या वादावादीचे मारामारीत रुपांतर झाले. यावेळी ओंकार शिकलगार याने खिशातील कटरने पटेलवर वार करून जखमी केले तर सोडवणुकीसाठी आलेल्या ओंकार माने यालाही पाण्याच्या जगने मारहाण करून संशयित तिघांनी लथाबुक्क्याने मारहाण केली होती.
यात ओंकार माने व अमीनमहंमद पटेल जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान आज सकाळी ओंकार माने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण असल्याने औरवाड परिसरात पोलीस बंदोबस्त लावला आहे.