तंबाखू दिली नाही म्हणून दगडाने ठेचून निर्घृण खून, घरगुती गणेश विसर्जनादिवशीच कोल्हापुरात उडाली खळबळ
By तानाजी पोवार | Published: September 5, 2022 03:49 PM2022-09-05T15:49:14+5:302022-09-05T16:17:25+5:30
आज, घरगुती गणेश विसर्जनासाठी नागरिक घराबाहेर पडत असतानाच सकाळच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह रस्त्याकडेला आढळला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
कोल्हापूर : तंबाखू खिशात असताना नाही म्हणून खोटं बोलल्याच्या रागातून दोघांनी एकाचा लाकडी बांबूने व दगडाने ठेचून निर्घृण खून केला. शंकर आकाराम कांबळे (वय ५५ रा. माळापुडे, ता. शाहुवाडी) असे मृताचे नाव आहे. आज, सोमवारी पहाटे शिवाजी उद्यमनगर परिसरात कोटीतीर्थ तलावानजीक ही घटना घडली.
आज, घरगुती गणेश विसर्जनासाठी नागरिक घराबाहेर पडत असतानाच सकाळच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह रस्त्याकडेला आढळला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित शुभम अशोक शेंडगे (वय २८ रा. यादवनगर) याला ताब्यात घेतले. तर रोहित अजय सूर्यगंध (२७ रा. यादवनगर) चा शोध घेत आहेत.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, शंकर कांबळे हे आठ दिवसांपूर्वी कोल्हापुरात आपल्या मुलीकडे आले होते. सोमवारी पहाटे ते कोटीतीर्थ परिसरात फिरत होते. यावेळी शुभम शेंडगे व रोहित सूर्यगंध या संशयितांनी त्यांच्याकडे तंबाखूबाबत विचारणा केली. कांबळे यांनी तंबाखू नसल्याचे सांगितले. संशयित दोघांनी कांबळे यांना पकडून अंगझडती घेतली, त्यांच्या खिशात तंबाखू आढळली. खोटे बोलल्याच्या रागातून दोघांनी त्यांना बेदम मारले. शेजारील दगड व लाकडी बांबू डोक्यात घालून ठेचले. रक्तबंबाळ अवस्थेत तेथेच टाकून पलायन केले. अतिरक्तस्त्रावामुळे कांबळे यांचा मृत्यू झाला.
सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पो. नि. संजय गोर्ले, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमासे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे घटना उघड
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्या भागातून रोहित व शुभम फिरताना कॅमेऱ्यात कैद झाले. त्यावरून छडा लागला.