एक लाख १६ हजार मुलांना जंतनाशक गोळ्या देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 12:20 PM2021-03-02T12:20:05+5:302021-03-02T12:24:17+5:30
Muncipal Corporation Health Kolhapur- राज्य शासनाने राष्ट्रीय जंतनाशक मोहीम दिन व मॉप अप दिन राबविण्याच्या सूचना दिल्या असून, त्याअनुषंगाने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील १ ते १९ वर्षे वयोगटातील एक लाख १६ हजार ३० इतक्या मुलांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पत्रकारांना सांगितली.
कोल्हापूर : राज्य शासनाने राष्ट्रीय जंतनाशक मोहीम दिन व मॉप अप दिन राबविण्याच्या सूचना दिल्या असून, त्याअनुषंगाने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील १ ते १९ वर्षे वयोगटातील एक लाख १६ हजार ३० इतक्या मुलांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पत्रकारांना सांगितली.
अंगणवाडीत जाणारे व इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या पटावर असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना तसेच शाळेत न जाणाऱी सर्व मुले व मुली यांना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतामुळे होतो. याचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव असणे हा आहे.
कृमीदोष हा रक्तक्षय व कुपोषणाचे कारण आहे. तसेच बालकांची बौध्दिक व शारीरिक वाढ खुंटण्याचे कारण ठरतो. कृमीदोष आढळणारी मुले ही कायम अशक्त आणि थकलेली असतात व ती अभ्यासाकडे लक्ष देऊ शकत नाहीत. तसेच शाळेतही अनुपस्थित असतात. याचा दुष्परिणाम त्यांच्या भवितव्यावर होतो. म्हणून भावी पिढी सुदृढ व सशक्त होण्याकरिता जंतनाशक गोळ्या देणे आवश्यक आहे.
मोहीम महापालिकेच्या ११ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत सोमवापासून सुरू झाली. शहरातील २१४ आशा स्वयंसेविका व २०० अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत अंगणवाडीतील व शाळेत न जाणारे १ ते १९ वर्षातील मुलांना घराघरात जाऊन जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी आपल्या मुलांना जंतनाशक गोळी देऊन कृमीदोष व कुपोषणापासून संरक्षण करावे, असे आवाहन प्रशासक बलकवडे यांनी केले आहे.