वर्षभरात एक लाख लोकांचा कोल्हापुरातून विमानप्रवास - कमलकुमार कटारिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 12:42 AM2019-12-15T00:42:38+5:302019-12-15T00:45:07+5:30
चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद मर्यादित साधने, मनुष्यबळाच्या जोरावर कमी कालावधीत कोल्हापूर विमानतळाला देशाच्या विमानक्षेत्राच्या नकाशावर आणण्यात यश आले आहे. सर्वांचे सहकार्य आणि पाठबळावर विमानतळाचा विकास करण्याचे माझे ध्येय आहे. - कमलकुमार कटारिया
संतोष मिठारी ।
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर या मार्गावरील विमानसेवेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त विमानतळ विकास, सुरू असलेल्या कामांची स्थिती, नवीन मार्गांवरील सेवांची सुरुवात, आदींबाबत या विमानतळाचे संचालक कमलकुमार कटारिया यांच्याशी साधलेला हा थेट संवाद.
- प्रश्न : कशा पद्धतीने काम केले?
उत्तर : ‘उडान’ योजनेमध्ये समावेश असलेल्या कोल्हापूर विमानतळ येथून विमानसेवा सुरू करण्यासह विमानतळ विकसित करण्याची जबाबदारी भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने माझ्यावर सोपविली. त्यानुसार या विमानतळाचा संचालक म्हणून १३ डिसेंबर २०१८ रोजी या ठिकाणी रुजू झालो. विमानतळाची सर्वांगीण माहिती जाणून घेतली. त्यानंतर पायाभूत सुविधा, धावपट्टीचा विस्तार, मनुष्यबळाची उपलब्धता, आदी आव्हाने दिसून आली. ती पेलण्यासह विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा निश्चित केला आणि काम सुरू केले. नियोजनबद्ध काम करून अलायन्स एअर, इंडिगो, ट्रू जेट कंपन्यांची विविध मार्गांवरील विमानसेवा सुरू केली.
- प्रश्न : विमानसेवेबाबत काय सांगाल?
उत्तर : विमानतळ छोटा असूनदेखील कोल्हापूर शहराची सध्या तिरूपती,
बंगलोर, हैदराबाद आणि मुंबईशी ‘कनेक्टिव्हिटी’ वाढली आहे. गेल्या वर्षी
९ डिसेंबरला ‘अलायन्स एअर’ची हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर या मार्गावरील सेवा
सुरू झाली. आता कोल्हापुरातून रोज दहा वेळा विमानांची ये-जा होते. गेल्या वर्षभरात या विमानतळावरून २६२९ विमानांची ये-जा झाली असून त्यातून एक लाख सहा हजार ३२९ जणांनी प्रवास केला आहे. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, क-हाड, कोकण, बेळगावमधील लोकांचा समावेश आहे. यावर्षी कोल्हापूर-सांगलीमध्ये महापूर आला. त्यावेळी एकमेव विमानसेवेची कनेक्टिव्हिटी कोल्हापूरला उपलब्ध होती. ७ ते १२ आॅगस्टदरम्यान १६० फ्लाईट येथून आॅपरेट झाल्या. त्यात १२८ या नॉन-शेड्युल्ड, तर ३२ शेड्युल्ड फ्लाईट होत्या. त्यातून एकूण १८४६ जणांनी प्रवास केला. विमानोड्डाण क्षेत्रातील अडथळ्यांवर आॅब्स्टॅकल लाईट लावण्याचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
भविष्यातील नियोजन ?
कोल्हापूर-अहमदाबाद, गोवा आणि कोल्हापूर-तिरूपती व मुंबई मार्गावर आणखी एक विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. याबाबत काही विमान कंपन्यांचा सर्व्हेदेखील सुरू आहे. त्यात सिटी बस आणि कार रेंटल सर्व्हिस, हॉटेल बुकिंगची सुविधा, फूड सेंटर, पर्यटन माहिती केंद्र, अद्ययावत वेटिंग रूम, आदींचा समावेश आहे. हुबळी, बेळगाव धर्तीवर कोल्हापूर विमानतळाचा विकास करावयाचा आहे.