कोल्हापूर विभागात एक कोटी टन उसाचे गाळप
By admin | Published: January 15, 2016 11:35 PM2016-01-15T23:35:46+5:302016-01-16T00:50:21+5:30
गाळपात वारणा, जवाहर आघाडीवर : साखर उताऱ्यात गुरुदत्त टाकळी, बिद्री ‘लय भारी’
प्रकाश पाटील -- कोपार्डे --कोल्हापूर विभागातील (कोल्हापूर, सांगली) एकूण ३८ साखर कारखान्यांनी गेल्या अडीच महिन्यांत एक कोटी ७ लाख २६ हजार ९७७ मे. टन उसाचे गाळप करण्यात आले असून, ११.८३च्या सरासरी साखर उताऱ्यास एक कोटी ३२ लाख १२ हजार ४९ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. ४१ पैकी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन सहकारी दौलत व इंदिरा महिला कारखाने, तर सांगली जिल्ह्यातील तासगांव सहकारी कारखाना हे बंद आहेत.साखरेचे दर गडगडल्याने एफआरपीप्रमाणे एकरकमी दर देता येणे शक्य नाही. एफआरपी देण्यासाठी कारखान्यांना एकतर शासनाने आर्थिक मदत करावी अथवा दोन टप्प्यांत एफआरपी देण्याची मुभा द्यावी, अशी भूमिका कारखानदारांनी घेतली. यामुळे हंगाम २०१५/१६ सुरूहोण्याबाबत मोठी अडचण निर्माण झाली होती; पण खासदार राजू शेट्टी, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील, मुख्यमंत्री यांनी तोडगा काढत अगोदर कारखाने सुरू व किमान एफआरपी तरी देण्याची कायदेशीर बंधने घालू. त्यासाठी ६ डिसेंबरची मुदत कारखानदारांना देण्यात आली; मात्र साखरेच्या दरात सुधारणा होत नसल्यामुळे एफआरपी रकमेपैकी किमान ८० टक्के रक्कम पहिला हप्ता व २० टक्के रक्कम दुसऱ्या हप्त्यापोटी देण्याचे सूत्र ठरले. याला मान्यता कारखानदारांनीही दिल्याने या हंगामात कोणताच अडथळा आला नाही. मागील वर्षी पावसाची घटलेली टक्केवारी पाहता शेतीतील उभा ऊस ठेवणे शेतकऱ्यांसाठीही जिकिरीचे झाले आहे. सर्वच मोठ्या धरणांतील पाण्याच्या साठ्यामध्ये घट झाल्याने पाटबंधारे विभागानेही शेतीच्या पाणी कपातीचा निर्णय घेतल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. सध्या लवकरात लवकर कारखाने कसा ऊस तोडून नेतील या विवंचणेत शेतकरी आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ‘गुरुदत्त’ने १२.८१ टक्के उतारा घेत प्रथम, तर दूधगंगा वेदगंगा बिद्री कारखान्यांने १२.४१चा सरासरी साखर उतारा मिळवीत विभागात दुसरा क्रमांक मिळविला आहे. त्यापाठोपाठ दत्त दालमिया १२.४४ उतारा मिळवीत तिसरा क्रमांक मिळविला आहे.
सांगलीच्या माणगंगा कारखान्याने आठ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करीत विभागात प्रथम क्रमांक मिळविला आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा साखर कारखान्याने ६ लाख ९२ हजार ८०० मे. टन उसाचे गाळप करीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २३ पैकी २१ कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू असून, ६८ लाख ३८ हजार १०५ मे. टन उसाचे गाळप करीत १२.०६च्या सरासरी उताऱ्यासह ८० लाख ३० हजार ६७० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सांगली जिल्ह्यातील १८ पैकी एक साखर कारखाना बंद असून, १७ साखर कारखान्यांनी ३८ लाख ८८ हजार ८७२ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ५१ लाख ८१ हजार ३७९ क्विंटल साखर ११.८६च्या सरासरी उताऱ्याने उत्पादन केले आहे.
दृष्टीक्षेपात कोल्हापूर विभागाचा गाळप हंगाम
सांगली
कारखाने- १८
चालू- १७
बंद- ०१
उसाचे गाळप- ३८ लाख ८८ ह.
८७२ मे. टन
साखर उत्पादन- ५१ लाख ८१ ह. ३७९ क्विंटल
सरासरी उतारा- ११.८६
कोल्हापूर
कारखाने- २३
चालू- २१
बंद- ०२
ऊस गाळप- ६८ लाख ३८ ह.
१०५ मेट्रिक टन
साखर उत्पादन- ८० लाख ३० ह.
६७० क्विंटल
सरासरी उतारा- १२.०६