तिन्ही करारावेळी एकच अधिकारी?
By Admin | Published: March 27, 2015 12:20 AM2015-03-27T00:20:07+5:302015-03-27T00:21:41+5:30
शिवसेना, ‘प्रजासत्ताक’चा अधिकाऱ्यावर आक्षेप
कोल्हापूर : जनता बझारच्या रुईकर कॉलनी, शिवाजी पेठ व राजारामपुरी येथील मिळकतींचा भाडेकरार करताना या तिन्ही ठिकाणी मुद्रांक शुल्क विभागाचे करवीर क्रमांक १ चे सह. दुय्यम निबंधक वर्ग २ अधिकारी एस. पी. लादेच कसे? असा आक्षेप शिवसेना व प्रजासत्ताक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. त्यांनी गुरुवारी मुद्रांक जिल्हाधिकारी उदयराज चव्हाण यांची भेट घेऊन दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
यावर चव्हाण यांनी या संदर्भात मंगळवारी (दि. ३१) सुनावणी घेतली जाईल, असे सांगितले.
कसबा बावडा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील मुद्रांक शुल्क कार्यालयात गुरुवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
संजय पवार यांनी, आपल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार झाला आहे का? अशी शंका वाटते. त्यामुळे त्यांचीही चौकशी करून गुन्हे दाखल करावेत. तसेच तक्रारदारांची माहिती चुकीची वाटत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी चव्हाण यांच्याकडे केली.
उदयराज चव्हाण यांनी तक्रार अर्जानुसार करार करून देणारे व घेणारे यांची मंगळवारी (दि. ३१) सुनावणी घेऊन त्यावर निर्णय देऊ असे सांगितले. तसेच दस्ताची वैधता व आक्षेपाचे स्वरूप तक्रारदारांनी सविस्तरपणे द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सह. दुय्यम निबंधक वर्ग २ अधिकारी एस. पी. लादे, दिलीप पाटील-कावणेकर, कमलाकर जगदाळे, शशी बिडकर, अप्पा पुणेकर, रवी चौगुले, रणजित आयरेकर, दत्ताजी टिपुगडे, हर्षल सुर्वे, प्रवीण पालव, आदी उपस्थित
होेते. (प्रतिनिधी)