खोटी माहिती देणाऱ्या १५८ शिक्षकांची एक वेतनवाढ रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 01:16 AM2019-03-28T01:16:27+5:302019-03-28T01:18:07+5:30
चुकीची माहिती भरून सोईची बदली करून घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या १५८ प्राथमिक शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यानुसार वेतनवाढ रद्द करण्याची पत्रे जिल्हा परिषदेत तयार असून, या चार
कोल्हापूर : चुकीची माहिती भरून सोईची बदली करून घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या १५८ प्राथमिक शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यानुसार वेतनवाढ रद्द करण्याची पत्रे जिल्हा परिषदेत तयार असून, या चार दिवसांत संबंधित शिक्षकांना ती लागू करण्यात येणार असून या सर्वांना पुन्हा ‘रँडम’ गटातून बदलीला सामोरे जावे लागणार आहे.
गेल्यावर्षी राज्य शासनाने जिल्हा परिषदेकडील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया राबवली होती; मात्र, कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील १५८ शिक्षकांनी पोर्टलला चुकीची माहिती भरली. परिणामी, या सर्वांच्या सोईच्या बदल्या झाल्या. ज्यांच्यावर अन्याय झाला, अशा शिक्षकांनी हा सर्व खोटेपणा उघडकीस आणून संबंधितांवर कारवाईचीही मागणी केली होती.
या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर अनेक शिक्षकांनी आपली नोकरी सुरू झाल्याची तारीख चुकीची भरली, काहींनी सोईच्या बदलीसाठी अंतराचा चुकीचा दाखला जोडला, अनेकांनी खोटी वैद्यकीय प्रमाणपत्रे जोडली, पती-पत्नींपैकी एकाच्या सेवेला मान्यता नसताना पती-पत्नी एकत्रिकरणाचा लाभ काहीजणांनी घेतला, पती-पत्नींपैकी जोडीदार परजिल्ह्यात असताना या जिल्ह्यात पती-पत्नी एकत्रिकरणाचा लाभ घेतला, तर एका बहाद्दराने पत्नी खासगी कार्यालयात नोकरीला असताना ती शासकीय सेवेत असल्याचा दाखला जोडला.
राज्यातील अन्य काही जिल्हा परिषदांमधून यापूर्वीच अशा शिक्षकांवर कारवाई झालेली आहे. मात्र कोल्हापुरात या शिक्षकांवर कारवाई होऊ नये, यासाठी काही पदाधिकारी आणि शिक्षक संघटनांचे नेतेही प्रयत्नशील होते; मात्र शासनाच्या निर्देशानुसार त्यांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
‘रँडम’ गटातून बदल्या म्हणजे काय ?
ज्यांनी चुकीची माहिती भरून सोईच्या बदल्या करून घेतल्या, त्यांना यंदाच्या बदल्यांच्या प्रक्रियेमध्ये ‘रँडम’ गटातून सामोरे जावे लागणार आहे. सर्वांच्या विविध निकषांनुसार बदल्या झाल्यानंतर उरतील त्या गावांमध्ये या शिक्षकांच्या आता बदल्या होणार आहेत. यामध्ये मला पाहिजे ते गाव द्या म्हणण्याची कोणतीही सोय नाही. शासनाच्या लेखी माहितीमध्ये खोटेपणा केल्यामुळे या शिक्षकांना तो अंगलट आला आहे.