Kolhapur- अल्पवयीन मुलीचा विनयभंग: एकास ५ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा
By भीमगोंड देसाई | Published: July 14, 2023 07:19 PM2023-07-14T19:19:55+5:302023-07-14T19:21:29+5:30
आरोपी रत्नागिरी जिल्हयातील
कोल्हापूर : अल्पवयीन मुलीचा विनयभंगप्रकरणी यशवंत राजाराम मेणे (वय ४६ रा. अरवली ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी) यास ५ वर्षे सक्त मजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा शुक्रवारी झाली. जिल्हा व सत्र न्यायधीश एम. बी. तिडके ही शिक्षा सुनावली. याप्रकरणात अॅड अमिता कुलकर्णी यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.
याबाबत अधिक माहिती अशी की, यशवंत मेणे हा पन्हाळा तालुक्यातील एका गावातील दूध संस्थेच्या टेंपोवर क्लिनर म्हणून कामास होता. ८ फेब्रुवारी २०१५ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्याने परिसरातील अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन केले. काही वेळातच पिडीत मुलगी रडत घरी आली व तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. पिडीतेच्या आईने अन्य नातेवाईकांना याची माहिती दिली. त्यांनी तात्काळ यशवंत मेणे यास याबाबत विचारणा केली. मात्र त्याने सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला नातेवाईकांनी धरुन पोलिसांच्या ताब्यात दिले.
पन्हाळा पोलीस ठाण्यात यशवंत मेणे याच्यावर बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण कलम कायदा १० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांच्यासमोर झाली. यामध्ये सात साक्षीदार तपासले. आरोपी मेणे यास ५ वर्ष सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा आणि दंड न भरल्यास ६ महिन्याची शिक्षा सुनावली.