‘बालगोपाल’चा एकतर्फी विजय

By admin | Published: June 1, 2016 01:37 AM2016-06-01T01:37:00+5:302016-06-01T01:37:37+5:30

फुटबॉल महासंग्राम : ‘पीटीएम’वर ३-० ने मात, सूरज जाधव ‘सामनावीर’

One-sided victory of 'Balagopal' | ‘बालगोपाल’चा एकतर्फी विजय

‘बालगोपाल’चा एकतर्फी विजय

Next

कोल्हापूर : उत्तरार्धातील आक्रमक खेळाच्या जोरावर बालगोपाल तालीम मंडळाने पाटाकडील तालीम मंडळावर (अ) ३-० अशा गोलने मात करीत एकतर्फी विजय मिळविला. फुटबॉल महासंग्राम स्पर्धेत मंगळवारी झालेल्या या सामन्यात दोन गोल नोंदविणारा सूरज जाधव हा ‘बालगोपाल’च्या विजयाचा शिल्पकार आणि सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू ठरला.
सॉकर अमॅच्युअर इन्स्टिट्यूटतर्फे (साई) येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरू आहे. यातील साखळी फेरीअंतर्गत मंगळवारी बालगोपाल व पीटीएम यांच्यात सामना झाला. सामन्यात प्रारंभापासून दोन्ही संघांनी गोल नोंदवून आघाडी मिळविण्याचा प्रयत्न केला; पण समन्वयातील अभाव तसेच दोन्ही संघांच्या बचावफळीच्या भक्कम कामगिरीमुळे गोल नोंदविण्यात आघाडीच्या फळीतील खेळाडूंना यश आले नाही. मध्यंतराला सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात दोन्ही संघांनी चढायांवर भर देत खेळ केला; पण यात ‘बालगोपाल’कडून आक्रमक खेळ झाला. यात सामन्याच्या ५१ व्या मिनिटाला ‘बालगोपाल’च्या सूरज जाधवने मोठ्या ‘डी’बाहेरून चेंडू गोलजाळीत धाडून संघाचे गोलचे खाते उघडले. त्यानंतर रोहित कुरणे, आकाश भोसले यांच्या चढाया ‘पीटीएम’चा गोलरक्षक शैलेश पाटीलने परतावून लावल्या. यात ‘बालगोपाल’च्या आकाश भोसलेने रोहित कुरणेच्या पासवर सामन्याच्या ८६ व्या मिनिटाला गोल नोंदवून ‘पीटीएम’ला धक्का दिला. गोल आघाडी वाढल्याने ‘पीटीएम’कडून काहीसा विस्कळीत खेळ झाला. यातच ‘बालगोपाल’च्या सूरज जाधवने रोहित कुरणेच्या पासवर सामन्याच्या ९३ व्या मिनिटाला वैयक्तिक दुसऱ्या आणि संघाच्या खात्यात तिसऱ्या गोलची भर घातली. त्यावर त्यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला; तर, ‘पीटीएम’चे समर्थक निराश होऊन प्रेक्षक गॅलरीतून जाऊ लागले. सामन्यात उर्वरित वेळेत ‘पीटीएम’ला गोल नोंदविण्यात यश आले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: One-sided victory of 'Balagopal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.