एकतर्फी हद्दवाढ करणार नाही : मुख्यमंत्री

By admin | Published: February 24, 2016 01:08 AM2016-02-24T01:08:37+5:302016-02-24T01:08:37+5:30

जनसुनावणी होणार : पालकमंत्री घेणार लवकरच बैठक; जिल्ह्यातील तीन आमदारांना आश्वासन

One-sided will not increase: CM | एकतर्फी हद्दवाढ करणार नाही : मुख्यमंत्री

एकतर्फी हद्दवाढ करणार नाही : मुख्यमंत्री

Next

कोल्हापूर/शिरोली : कोल्हापूर शहराची हद्दवाढ करताना जनसुनावणी घेतली जाणार असून, यासंदर्भात एकतर्फी कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर जिल्ह्यातील आमदारांची बैठक लवकरच घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कोल्हापूर शहराच्या नियोजित हद्दवाढीस १७ गावांतून विरोध होत आहे. त्यासाठी रास्ता रोको, गाव बंद अशी आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी आमदार अमल महाडिक, आमदार सुजित मिणचेकर, आमदार चंद्रदीप नरके यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना हद्दवाढीच्या विरोधात निवेदन दिले.
शहराच्या हद्दीत समाविष्ट व्हायला सर्व गावांतील नागरिकांचा तीव्र विरोध असून, त्यासाठी गेल्या चार दिवसांपासून विविध गावांतून आंदोलन सुरू आहे, गावांतील व्यवहार बंद आहेत. रास्ता रोकोसारखी आंदोलने होत आहेत, ही बाब आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
आमदार मिणचेकर म्हणाले, शिरोली आणि नागांव या दोन्ही गावांचा हद्दवाढीच्या प्रस्तावात समावेश केला आहे. गेल्या चार दिवसांपासून शिरोली बेमुदत बंद आहे. कोठ्यांवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. शिरोलीकरांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन केले. तर मंगळवारपासून साखळी उपोषण सुरु आहे. शिरोली आणि नागांव ही हातकणंगले तालुक्यातील दोन गावे आहेत. नैसर्गिक दृष्ट्या ही शहरापासून वेगळी आहेत. गेल्या वीस वर्षापासून शिरोलीचा स्वतंत्र नगरपालिकेचा प्रस्ताव मंत्रालयात आहे. शिरोलीला नगरपालिका मंजूर करावी. यावेळी गेल्या चार दिवसांत वर्तमानपत्रात हद्दवाढीविरोधात आलेल्या बातम्यांची फाईलच मुख्यमंत्र्यांना मिणचेकर यांनी दाखविली.
आमदार महाडिक म्हणाले, कोल्हापूर शहरात राहणाऱ्या जनतेला महापालिका योग्य सुविधा देऊ शकत नाही. आज ही शहरातील बऱ्याच उपनगरात रस्ते, गटारी, वीज या सुविधा मिळत नाहीत. मग या १७ वाढीव गावांना घेऊन काय साधणार आहे. शहराने अगोदर विकास करावा, मगच शेजारच्या गावांना हद्दवाढीस येण्यास आव्हान करावे. त्यामुळे हद्दवाढीला शिरोली, नागांवसह १७ गावांचा विरोध आहे, तरी जनतेवर हद्दवाढ लादू नये.
आम. नरके म्हणाले, हद्दवाढीला ग्रामीण भागातील जनतेचा तीव्र विरोध आहे. हद्दवाढीमुळे ग्रामीण जनता भरडली जाणार. व्यापारांचे मोठे नुकसान होणार आहे. कृती समितीच्या माध्यमातून मोठे आंदोलन उभारण्याची शक्यता आहे. त्यामुळे हद्दवाढ रद्द करावी.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हद्दवाढीसंदर्भात जनसुनावणी घेतली जाईल, एकतर्फी निर्णय घेतला जाणार नाही, असे सांगितले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे लवकरच आमदार अमल महाडिक, आमदार सुजित मिणचेकर, आमदार चंद्रदीप नरके यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करतील, त्यातून मार्ग काढतील; परंतु चर्चा, जनसुनावणीशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: One-sided will not increase: CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.