विद्यार्थ्यांच्या एका गणवेशाला लागली कात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:24 AM2021-02-10T04:24:03+5:302021-02-10T04:24:03+5:30
कोल्हापूर : महापालिकेच्या शाळेतील मुलांसाठी शासनाकडून दरवर्षी दोन गणवेशांचे पैसे दिले जातात. यंदा मात्र एकाच गणवेशाचे पैसे दिले जाणार ...
कोल्हापूर : महापालिकेच्या शाळेतील मुलांसाठी शासनाकडून दरवर्षी दोन गणवेशांचे पैसे दिले जातात. यंदा मात्र एकाच गणवेशाचे पैसे दिले जाणार आहेत. बीआयएस स्टॅण्डर्डप्रमाणे कापडाची अट घालण्यात आली आहे. परंतु, ३०० रुपयांत चांगल्या दर्जाचा गणवेश कसा होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
समग्र शिक्षा मोफत गणवेश योजनेतून महापालिकेतील ५८ शाळांतील सर्व मुली, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील मुलांना दोन गणवेशांसाठी अनुदान दिले जाते. कोल्हापूर महापालिकेतील ६५२८ विद्यार्थी यासाठी पात्र आहेत.
-------------------------------------------------------------
इंधन दरवाढ, वीज बिल माफीसाठी संभाजी ब्रिगेडची निदर्शने
कोल्हापूर: पेट्राेल, डिझेलचे भरमसाट वाढलेले दर कमी करावेत, लॉकडाऊन काळातील वीज बिले माफी करावीत या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिले. जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
---------------------------------------------------------
सांगली महापालिकेच्या घरपट्टीतील दंड होणार माफ
सांगली : महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त सत्ताधारी भाजपने नागरिकांना घरपट्टी शास्तीत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी होणाऱ्या महासभेत घरपट्टीच्या शास्तीत १०० टक्के माफ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. ही सवलत १५ फेब्रुवारी ते ३० मार्चअखेर असेल. या सवलत माफीचा लाभ नागरिकांनी घेऊन घरपट्टीची थकबाकी भरावी, असे आवाहन भाजपचे नेते शेखर इनामदार, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, गटनेते विनायक सिंहासने यांनी केले आहे.
-------------------------------------------------------------
सांगलीत घर फाेडून पावणेदाेन लाख लंपास
सांगली : शहरातील अण्णासाहेब पाटीलनगर येथील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी घराचे मालक राजेंद्र सदाशिव चव्हाण यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.
-------------------------------------------------------------
१२३ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या समुपदेशनातून
सातारा : आंतरजिल्हा बदली झालेल्या १२३ प्राथमिक शिक्षकांना समुपदेशनातून शाळा देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात नवीन आलेल्या या शिक्षकांना गटशिक्षणाधिका-यांसह उपस्थितांनी भौगोलिक माहिती देऊन त्यांच्या सोयीची शाळा निवडण्यास साहाय्य केले आहे.
---------------------------------------------------------
मतदार छायाचित्र ओळखपत्रात रत्नागिरी राज्यात अव्वल
रत्नागिरी : मतदार छायाचित्र ओळखपत्राचे जिल्ह्यात १०० टक्के काम झाले आहे. जिल्ह्यातील १३ लाख १२ हजार ९४९ मतदारांचे छायाचित्र ओळखपत्राचे काम पूर्ण झाले असून, १०० टक्के काम झालेला रत्नागिरी जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून ही आकडेवारी शासनाने प्रसिद्ध केली आहे.
---------------------------------------------------------
खवल्या मांजराची तस्करी करणारे तिघे ताब्यात
चिपळूण (जि. रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मौजे भोगाव खुर्द (ता. पाेलादपूर) येथे वन विभागाने कारवाई करून, खवले मांजरासह तिघांना ताब्यात घेतले आहे. हे तिघेही चिपळुणातील असून, त्यात एका रिक्षा व्यावसायिकाचाही समावेश आहे. या कारवाईत रिक्षामालक नरेश प्रकाश कदम, सागर श्रीकृष्ण शिर्के, सिकंदर भाई साबळे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
---------------------------------------------------------
चिपी विमानतळाचा मुहूर्त ठरला, १ मार्चला उद्घाटन
सिंधुदुर्गनगरी : चिपी विमानतळावर काल दोन लॅंडिंग ट्रायल झाल्या. त्या दोन्ही यशस्वी झाल्या. त्यामुळे आयआरबी कंपनीने उद्घाटनाचा कार्यक्रम १ मार्च रोजी आयोजित केला आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
---------------------------------------------------------
कर्जमाफीसाठी धरणे आंदोलन
सिंधुदुर्गनगरी : महिला बचत गटांनी देशात लॉकडाऊन होण्यापूर्वी घेतलेले कर्ज माफ व्हावे, दांडगाईने, जबरदस्तीने होत असलेल्या कर्जवसुलीला रोखण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टी सिंधुदुर्गच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. बहुजन मुक्ती पार्टी सिंधुदुर्गच्यावतीने केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक धोरणाच्या विरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.
---------------------------------------------------------
प्रश्न सोडवा, नंतरच उड्डाण पूल चालू करा
कणकवली (जि. सिंधुदुर्ग) : शहरातील महामार्ग चौपदरीकरणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या समस्या न सोडवता महामार्ग प्राधिकरणाने उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू केली. त्याबाबत माहिती मिळताच शिवसेनेने महामार्गाजवळ धाव घेत उड्डाण पुलावरील वाहतूक रोखून धरली. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता विवेक नवले यांनी, जोपर्यंत सर्व प्रश्न मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत वाहतूक सुरू करणार नाही, असे आश्वासन संदेश पारकर यांना दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.