पन्हाळ्यातील बिबट्याला पकडताना ‘वन’ची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:46 AM2019-04-05T00:46:35+5:302019-04-05T00:46:41+5:30
पन्हाळा : पन्हाळगडाच्या पायथ्याशी मंगळवार पेठ ते इब्राहिपूर पेठदरम्यान वाद नावाच्या शेतात गेले तीन ते चार दिवस बिबट्या व ...
पन्हाळा : पन्हाळगडाच्या पायथ्याशी मंगळवार पेठ ते इब्राहिपूर पेठदरम्यान वाद नावाच्या शेतात गेले तीन ते चार दिवस बिबट्या व त्याची दोन पिल्लांचा वावर सुरू आहे. लावलेल्या पिंजऱ्याकडे हा बिबट्या फिरकलाच नसल्याने त्याला जेरबंद करताना वनविभागाची दमछाक होत आहे.
पन्हाळा परिसरात मादी बिबट्या आणि दोन पिल्लांचा वावर आहे. या बिबट्याने पन्हाळ््याच्या पायथ्याशी असलेल्या मंगळवार पेठेतील दोन कुत्री नेली. संजय चाचुर्डे यांच्या कुत्र्याला नेताना गावकऱ्यांनी आरडाओरडा केल्यामुळे कुत्र्याला सोडून त्याने पन्हाळगडाच्या तटबंदीच्या दिशेने पळ काढला. बुधवारी मध्यरात्री हा बिबट्या वाद नावाच्या शेतात होता, असे वनविभागाचे कर्मचारी दिलीप वाघवेकर यांनी सांगितले तर रात्री पावणेबाराच्या सुमारास मंगळवार पेठेतील ग्रामस्थांना डरकाळी ऐकू आली. सकाळी वनविभागाला तेथे बिबट्याच्या पायाचे ठसे दिसले.
वनविभागाने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन दिवसांपासून परिसरात पिंजरा लावला आहे. मात्र, या पिंजºयाकडे तो फिरकलाच नाही. गुरुवारी पन्हाळगडाच्या पश्चिमेस असणाºया इंजोळे गावातील जयसिंग पाटील यांनी मसाई पठारच्या तटबंदीच्या जंगलात बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे मंगळवार पेठ येथील बिबट्या या भागात स्थलांतर झाला आहे की इंजोळे भागात आणखी एका बिबट्याचा वावर वाढला आहे याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी पावनगड येथील जंगलात रहिवाशांनाही बिबट्याचे दर्शन झाले होते. एकूणच पन्हाळगडाचा परिसर बिबट्याच्या दहशतीखाली आला आहे.