कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार रिक्त पदांची भरती होणार -शासन निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:29 AM2018-05-25T00:29:01+5:302018-05-25T00:29:01+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात विविध शासकीय विभागांची वर्ग एक ते चारची एक हजार ५४ पदे रिक्त असून, राज्य शासनाने ही पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे
प्रवीण देसाई ।
कोल्हापूर : जिल्ह्यात विविध शासकीय विभागांची वर्ग एक ते चारची एक हजार ५४ पदे रिक्त असून, राज्य शासनाने ही पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात विविध विभागांची ३८ हजार रिक्त पदे भरण्याचे जाहीर केले आहे. यामुळे रिक्त पदे भरण्याचा मार्ग खुला झाला आहे.
राज्य शासनाने १६ मे रोजी घेतलेल्या निर्णयानुसार विविध नऊ विभागातील पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी विभाग, दुग्धविकास विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, ग्रामविकास, गृह, सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन, आरोग्य, जलसंपदा या विभागांतील १ हजार ५४ पदे भरण्याचा मार्ग खुला झाला आहे. शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी विविध विभागांतील महत्त्वाच्या सेवेशी निगडित असलेली पदे भरली जाणार आहेत. यामुळे कर्मचाºयांवरील ताण कमी होणार आहे. हा निर्णय झाला असला तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
परंतु या पदांव्यतिरिक्त इतरही शासकीय विभागात मोठ्या संख्येने पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात १२३ शासकीय विभाग असून, त्यामध्ये अंदाजे ३ हजार १४४ इतकी पदे रिक्त आहेत. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील ५० रिक्त पदांचा समावेश आहे. या रिक्त पदाबाबत शासन काय करणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या (अंदाजे)
विभाग रिक्त पदे
सार्वजनिक बांधकाम ५५०
जलसंपदा ३८९
कृषी ०९
ग्रामविकास ५८
दुग्धविकास ०३
मस्त्यव्यवसाय विकास ०६
गृह १५
पशुसंवर्धन ०७
आरोग्य १७