कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार ग्रामपंचायतींना मिळाला ४८ कोटींचा निधी, गावांचा होणार विकास 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 02:19 PM2023-04-11T14:19:34+5:302023-04-11T14:19:54+5:30

२६ जिल्हा परिषदांना निधी नाही

One thousand village panchayats of Kolhapur district got 48 crores fund, villages will be developed | कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार ग्रामपंचायतींना मिळाला ४८ कोटींचा निधी, गावांचा होणार विकास 

कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार ग्रामपंचायतींना मिळाला ४८ कोटींचा निधी, गावांचा होणार विकास 

googlenewsNext

समीर देशपांडे

कोल्हापूर : जिल्ह्यातील १०१५ ग्रामपंचायतींना गेल्या आर्थिक वर्षातील पंधराव्या वित्त आयोगातील बंधित निधीचा दुसरा हप्ता अदा करण्यात आला आहे. ही रक्कम ४७ कोटी ७२ लाख दहा हजार रुपये असून ती ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.

दोनच दिवसांपूर्वी याबाबत ग्रामविकास विभागाने शासन आदेश काढला आहे. एकूण राज्याला १ हजार ८३ कोटी रुपये इतका निधी अदा करण्यात आला आहे. यातील प्रत्येकी १० टक्के रक्कम जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी राखीव आहे, तर उर्वरित ८० टक्के रक्कम ही ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.

जिल्ह्यात जरी १०२५ ग्रामपंचायती असल्या तरी दहा ग्रामपंचायतींवर प्रशासक असल्यामुळे या ग्रामपंचायतींचा निधी अदा करण्यात आलेला नाही. या निधीतून स्वच्छता आणि हागणदारीमुक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची देखभाल व दुरुस्ती आणि पेयजल योजना, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर रिसायकलिंग यासाठी या निधीतून ५० टक्के निधी वापरणे बंधनकारक आहे. जर यातील एका बाबीची आधी पूर्तता झाली असेल तर उर्वरित निधी दुसऱ्या बाबीसाठी वापरता येणार आहे.

२६ जिल्हा परिषदांना निधी नाही

राज्यातील २६ जिल्हा परिषदा, २८९ पंचायत समित्या आणि ६३५ ग्रामपंचायतींवर प्रशासक आहेत. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या वाट्याचा हिस्सा यातून अदा करण्यात आलेला नाही. या सर्व संस्थांना गेल्या वर्षभरापासून निधी मिळालेला नाही. संस्थेवर प्रशासक असल्याचे कारण त्यासाठी सांगण्यात येते.

तालुकानिहाय ग्रामपंचायतींना दिलेला निधी

तालुका - ग्रामपंचायत - रक्कम
करवीर - ११२- ८ कोटी १८ लाख
गडहिंग्लज -८८ - ३ कोटी ३४ लाख
राधानगरी - ९७ - ३ कोटी ४७ लाख
चंदगड - १०८  - ३ कोटी ७९ लाख
पन्हाळा - ११०  - ४ कोटी ४६ लाख
आजरा - ७३ - १ कोटी ७८ लाख
भुदरगड - ९७  - २ कोटी ६० लाख
गगनबावडा - २९  -  ६२ लाख ५२ हजार
शाहूवाडी - १०६ - ३ कोटी १५ लाख
शिरोळ - ५२ - ५ कोटी ९९ लाख
कागल - ८३ - ४ कोटी २० लाख
हातकणंगले - ६० -  ७ कोटी ८७ लाख
एकूण - १०१५  - ४७ कोटी ७२ लाख १० हजार रुपये
 

Web Title: One thousand village panchayats of Kolhapur district got 48 crores fund, villages will be developed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.