‘वन टू का फोर’चे राजकारण गाडणार!
By admin | Published: October 9, 2015 01:05 AM2015-10-09T01:05:35+5:302015-10-09T01:13:31+5:30
नगरपरिषद पोटनिवडणूक : राजकीय वातावरण तापले; युतीचा संसार मोडला--रणसंग्राम
रत्नागिरी : कोणा एका व्यक्तीच्या पक्षातून जाण्यामुळे शिवसेनेला काहीच फरक पडणार नाही. उमेश शेट्येंचा करिश्मा केव्हाच संपला आहे. त्यामुळे ते पालिका पोटनिवडणुकीत कोणताच चमत्कार घडवू शकणार नाहीत. त्यांच्या ‘वन टू का फोर’ व ‘बनेगा तो बादशहा’ हे राजकारण शिवसैनिक गाडून टाकतील व चारही जागांवर सेनाच विजयी होईल, असा विश्वास शिवसेनेच्या नेत्यांनी आज (गुरूवारी) पत्रकार परिषदेत व्यक्त केला. शिवसेनेतर्फे पोटनिवडणुकीसाठी चार उमेदवारांच्या नावाची घोषणा गुरुवारी करण्यात आली. शिवसेनेला मदत करताना पक्षांतर केलेल्या चार नगरसेवकांना न्यायालयाने अपात्र ठरवले. मात्र, त्यांचा सेनेसाठीचा त्याग शिवसेना विसरणार नाही. त्यामुळेच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अपात्र झालेले बाळू साळवी, प्रीती सुर्वे, स्मितल पावसकर व मुनीज जमादार हे चारही नगरसेवक सांगतील त्यांनाच उमेदवारी देण्याचा आदेश दिला होता. त्यानुसारच रत्नागिरीतील पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यात आली आहे.
ज्यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामधील पूर्वा सुर्वे या प्रीती सुर्वे यांच्या स्नुषा आहेत. उमेदवार ऋतुजा देसाई या स्मितल पावसकर यांच्या नातेवाईक आहेत. उमेदवार दिशा साळवी या बाळू तथा दत्तात्रय साळवी यांच्या पत्नी आहेत, तर उमेदवार तन्वीर जमादार हे मुुनीज जमादार यांचे पती आहेत. सेनेसाठी त्याग करणाऱ्यांच्या मागे सेना ठामपणे उभी राहते, असे यावेळी आमदार राजन साळवी, उदय सामंत व जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी सांगितले. आरोप प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.(प्रतिनिधी)