कोल्हापूर लोकसभा मतदार संघात एकतर्फी विजय अन् सर्वपक्षीय जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 08:59 PM2019-05-23T20:59:40+5:302019-05-23T21:00:41+5:30
कडाक्याचा उष्म्यामुळे तापलेले वातावरण, क्षणाक्षणाला व्हॉटसअपवर मिळणारी मतांची इत्यंभूत माहिती यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी असलेल्या शासकीय गोदाम परिसरातील केंद्राकडे
कोल्हापूर : कडाक्याचा उष्म्यामुळे तापलेले वातावरण, क्षणाक्षणाला वॉस्अॅपवर मिळणारी मतांची इत्यंभूत माहिती यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी असलेल्या शासकीय गोदाम परिसरातील केंद्राकडे कार्यकर्त्यांना पाठ फिरवली खरी पण ताराबाई पार्कमधील आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयासमोर आणि रुईकर कॉलनीतील संजय मंडलिक यांच्या निवासस्थानासमोर दुपारनंतर सर्वपक्षीय जल्लोष सुरु झाला.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघात चुरशीने मतदान झाल्याचे चित्र होते. अटीतटीची लढत झाल्याने दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपापल्या उमेदवाराच्या विजयावर ठाम होते. त्यामुळे सकाळी जेंव्हा मतमोजणीला सुरवात झाली त्यावेळी कार्यकर्त्यांना काहीशी अस्वस्थता, हुरहुर लागून राहिलेली होती. त्यामुळे सकाळी कार्यकर्ते घरातून बाहेर पडले नव्हते. त्यातच गुरुवारी कमालीचा उष्मा आणि प्रचंड तापलेल्या वातावरणात येण्याचे टाळले. केवळ बंदोबस्तासाठी असलेले पोलिस, कर्मचारी तसेच पत्रकार, छायाचित्रकार यांची उपस्थिती होती. त्यामुळे केंद्राबाहेर गर्दी झालीच नाही. एरव्ही कार्यकर्त्यांच्या झुंडीच्या झुंडी हातात ध्वज घेऊन मतदान केंद्राबाहेर निकाल ऐकण्याकरीता जमायचे. परंतु तसे चित्र यावेळी पहायला मिळाले नाही.
पहिल्या तीन चार फेऱ्यात संजय मंडलिक मताधिक्य घेत असल्याचे लक्षात येताच कॉँग्रेस -राष्टवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना ठरवून दिलेल्या मेरी वेदर ग्राऊंडवर येण्याचे पूर्णत: टाळले. तर शिवसेनेचे काही कार्यकर्ते पितळी गणपती चौकात तसेच जिल्हा प्रमुख संजय मंडलिक यांच्या घरासमोर जमण्यास सुरवात झाली.
दरवेळेस गाड्यांचे सायलन्सर काढून फिरणारे बाईकवालेही पोलिसांच्या आदेशामुळे दिसले नाही. हा एक मोठा दिलासा सर्वसामान्य जनतेला मिळाला. गुलाल उधळून, ढोलताशा वाजवून विजयाचा जल्लोष साजरा केला पण सायलन्सर काढून गाड्या न फिरवल्याने हा निवडणूक जल्लोष लक्षात राहण्यासारखा राहीला, अशी प्रतिक्रीया काही लोकांनी दिल्या.