गणेशोत्सवासाठी पोलिसांची एक खिडकी योजना

By admin | Published: August 23, 2016 12:22 AM2016-08-23T00:22:19+5:302016-08-23T00:30:21+5:30

प्रशासकीय यंत्रणा सज्ज : मंडळांची धांदल सुरू; मंडप उभारणीचे काम यु्द्धपातळीवर

One window scheme for Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी पोलिसांची एक खिडकी योजना

गणेशोत्सवासाठी पोलिसांची एक खिडकी योजना

Next

कोल्हापूर : अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची धांदल शहरात सुरू झाली आहे. प्रशासकीय यंत्रणाही यासाठी सज्ज झाली आहे. पोलिस प्रशासनाने गणेश मंडळांना परवाना आणि ‘महावितरण’ने तात्पुरती वीजजोडणी घेण्याचे आवाहन केले आहे. एकंदरीत, शहरात गणेशोत्सवाचे वातावरण सुरू झाले आहे.
यंदा पाच सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यासाठी गणेश तरुण मंडळांनी मंडप घालण्यास सुरुवात केली आहे, तर गणेशोत्सवातील परवान्यांसाठी शहर पोलिस उपअधीक्षक कार्यालयाने शनिवार पेठेतील कार्यालयात ‘एक खिडकी योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत गणेश मंडळाचा परवाना, कोल्हापूर महापालिका व शहर वाहतूक नियंत्रण शाखा, कोल्हापूर यांचा एकत्रित परवाना देण्याचे काम सुरू केले आहे. सर्व गणेश मंडळांनी रीतसर परवाना अर्ज भरून परवाना घेणे बंधनकारक आहे.
तसेच गणेश मिरवणूक मार्गांवरील रस्ते सुस्थितीत करून त्यांचे पॅचवर्क करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे; पण पावसामुळे पॅचवर्क करण्यात आलेले नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसांत ऊन पडल्यास विशेषत: गंगावेश-कुंभार गल्ली, पापाची तिकटी, महाद्वार रोड, धोत्री गल्ली, शाहूपुरी कुंभार वसाहत, आदी रस्त्यांवरील पॅचवर्क करण्याचे नियोजन सुरू केले आहे. गणेश मंडळांना मंडप उभारणीसाठी एका खड्ड्याचा दर प्रशासनाने २५० रुपये ठेवला आहे.
त्याचबरोबर गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली जाते. सामाजिक व लोकशिक्षण करणारे देखावे उभारले जातात. मात्र, त्यासाठी अनधिकृत वीज वापरणे हा कायद्याने गुन्हा आहे. तसेच जीवित व वित्तहानी होण्याचा गंभीर धोका असतो. त्यामुळे सर्व गणेशोत्सव मंडळांनी उत्सवासाठी तात्पुरत्या स्वरूपाची अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. या धार्मिक कार्यक्रमासाठी महावितरणकडून तीन रुपये ७१ पैसे प्रतियुनिट इतक्या माफक दरात वीजपुरवठा करण्यात येणार आहे. इतर कोणत्याही वर्गवारीपेक्षा हा दर कमी असणार आहे. मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातूनही महावितरणच्या सर्व सेवा २४ तास उपलब्ध आहेत.



महावितरण मोबाईल अ‍ॅप व संकेतस्थळावरून, मध्यवर्र्ती ग्राहक सुविधा केंद्र अथवा नजीकच्या शाखा कार्यालयातून तात्पुरत्या नवीन वीजजोडणीकरिता अर्ज दाखल करावेत. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास तातडीने कोटेशन देण्याच्या व ते भरल्यावर त्वरित वीजजोडणी देण्याच्या सूचना सर्व कार्यालयांना दिल्या आहेत. जेणेकरून गणेश मंडळांना तत्काळ वीजजोडणी मिळणार आहे. सार्वजनिक उत्सव मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेऊन सुरक्षितपणे गणेशोत्सव साजरा करावा.
- शंकर शिंदे, मुख्य अभियंता, महावितरण,
कोल्हापूर परिमंडल.



गणेश मिरवणूक मार्गांवरील रस्त्यांचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. हे रस्ते सुस्थितीत करून पॅचवर्क करणार आहे.
- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता,
कोल्हापूर महापालिका.

शहरातील गणेश तरुण मंडळांनी लवकरात लवकर नोंदी करून घ्याव्यात. या ‘एक खिडकी योजने’चा लाभ घ्यावा.
- भारतकुमार राणे, शहर पोलिस उपअधीक्षक, कोल्हापूर.


‘आयएसआय’ प्रमाणित वायर वापरा...
गणेश मंडळांनी त्यांचे अंतर्गत वायरिंग अधिकृत ठेकेदाराकडूनच करावी; ती विद्युत निरीक्षकांकडून तपासून घ्यावी. त्यास अर्थिंग करावे व ‘ईएलसीबी’चा वापर करावा. आयएसआय प्रमाणित वायर वापराव्यात. वायरिंगचे जोड उघडे न ठेवता त्यावर इन्शुलेशन करावे. देखावे व मंडप वीज यंत्रणेपासून सुरक्षित अंतर ठेवून उभारावेत. महावितरणच्या वीज यंत्रणेशी छेडछाड करू नये. तसे केल्यास विद्युत कायदा २००३ नुसार कारवाई होऊ शकते. विजेसंबंधीच्या तक्रारीसाठी महावितरणच्या १८००२३३३४३५ व १८००२००३४३५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

एक महिना राहणार मंडप
गणेशोत्सव सुरू होण्याअगोदर १५ दिवस आणि त्यानंतर १५ दिवस असे एकूण ३० दिवस काही मंडळांनी मंडप घातले आहेत. त्यामुळे या मंडप मार्गांवरील वाहतुकीला अडथळा होत आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया शहरवासीयांतून उमटत आहेत.

Web Title: One window scheme for Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.