कोल्हापुरातही कांद्याची घसरण, आवक दुपटीने वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 11:25 AM2019-12-11T11:25:55+5:302019-12-11T11:27:56+5:30
नवीन कांदा बाजारात आल्याने देशभरात उसळी घेतलेले कांद्याचे दर आता वेगाने खाली येऊ लागले आहेत. राज्यातील इतर बाजार समित्यांप्रमाणे कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतही कांद्याच्या दराची घसरण सुरू झाली आहे.
कोल्हापूर : नवीन कांदा बाजारात आल्याने देशभरात उसळी घेतलेले कांद्याचे दर आता वेगाने खाली येऊ लागले आहेत. राज्यातील इतर बाजार समित्यांप्रमाणे कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतही कांद्याच्या दराची घसरण सुरू झाली आहे.
मंगळवारी निघालेल्या सौद्यात १० किलोंचा दर सरासरी ४०० रुपये झाला. चार दिवसांपूर्वी हाच दर १००० रुपयांवर गेला होता. समितीत येणाऱ्या कांद्याच्या आवकेतही दुपटीने वाढ झाल्याने दरात घसरण झाल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.
कोल्हापुरात घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याच्या वाढलेल्या दराने गेल्या काही वर्षांतील उच्चांक नोंदविला होता. किमान ७० ते १५० रुपये किलोप्रमाणे कांदा विकत घ्यावा लागत होता. वाढलेल्या दराचे पडसाद घरासह हॉटेलमधील जेवण व नाष्ट्यावरही पडलेले दिसत होते. वाढलेल्या दराचीच सर्वत्र चर्चा होत होती.
दरम्यान, वाढलेल्या दराचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून मान्सून ओसरल्यानंतर पेरलेला कांदा पक्व होण्याआधीच बाजारात आणला जात आहे. त्यामुळेच बाजार समितीत कांद्याची आवकही अचानक वाढू लागली आहे. दोन दिवसांपूर्वी १५ ते २० गाड्या होणारी आवक आता एकदम ४७ गाड्यांवर पोहोचली आहे.
आवकेत दुपटीने वाढ झाल्याने त्याचा परिणाम दरावरही झाल्याचे दिसत आहे. ज्या कांद्याला सोमवारी (दि. ९) निघालेल्या सौद्यात एक हजार रुपयांवर दर मिळाला, तो आता थेट ८०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. सरासरी दर ४०० रुपयांपर्यंत आला आहे.
मंगळवारी आठ हजार ९२० क्ंिवटल कांद्याची आवक झाली. त्याला प्रती १० किलो किमान १०० ते कमाल ८०० रुपये आणि सरासरी ४०० रुपये असा दर मिळाला. घाऊक बाजारातील हे दर घसरल्याने आता किरकोळ बाजारातही कांदा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार आहे.