कांदा मात्र तेजीत, साखर, तुरडाळीचे भाव कोल्हापूरच्या आठवडा बाजारात घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:17 AM2017-11-20T11:17:58+5:302017-11-20T11:53:36+5:30

दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणारी गाजरे कोल्हापूरच्या आठवडा बाजारात यंदा मात्र थोडी उशिरा दाखल झाली आहेत. भाजीपाल्याची आवक थोडी वाढल्याने दरात घसरण झाली असून साखर व तुरडाळीच्या दरही खाली येत आहेत. कांदा मात्र तेजीत असून घाऊक बाजारात ४० रुपयांपर्यंत कांदा राहिला आहे.

Onion, however, fell sharply, sugar and pulse prices fell in the week of Kolhapurundefined | कांदा मात्र तेजीत, साखर, तुरडाळीचे भाव कोल्हापूरच्या आठवडा बाजारात घसरले

लाल भडक गाजरांची रविवारी कोल्हापूरच्या  लक्ष्मीपुरी आठवडा बाजारात आवक झाली आहे. (छाया- नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देसाखर, तुरडाळीचे भाव घसरले, कांदा मात्र तेजीत भाजीपाल्याची आवक थोडी वाढल्याने दरात घसरण गुऱ्हाळघरांचा हंगाम जोरात, गुळाच्या आवकेत वाढ, लालभडक गाजरे, अंजीरची आवक सुरू

कोल्हापूर : दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणारी गाजरे कोल्हापूरच्या आठवडा बाजारात यंदा मात्र थोडी उशिरा दाखल झाली आहेत. लालभडक गाजरे ग्राहकांना भुरळ घालत आहेत. भाजीपाल्याची आवक थोडी वाढल्याने दरात घसरण झाली असून साखर व तुरडाळीच्या दरही खाली येत आहेत. कांदा मात्र तेजीत असून घाऊक बाजारात ४० रुपयांपर्यंत कांदा राहिला आहे.


परतीच्या पावसाने भाजीपाल्याला दणका दिल्याने मध्यंतरी भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले होते. या आठवड्यात भाज्यांची आवक हळूहळू वाढू लागली आहे. त्यामुळे गतआठवड्यापेक्षा दरात थोडी घसरण झाली आहे.

किरकोळ बाजारात वांगी व टोमॅटो ४० रुपये, गवार ६०, कोबी ३० रुपये दर आहे. ढब्बू, कारली, भेंडी, वरणा, दोडक्याचे दरही तुलनेत कमी झाले आहे. ओल्या वाटाण्याची आवक वाढली असून दरही सामान्य ग्राहकांच्या आवाक्यात आले आहेत. घाऊक बाजारात ओला वाटाणा सरासरी ५५ रुपये किलोपर्यंत आला आहे.

कोल्हापूरच्या बाजारात अंजीरची आवक सुरू झाली आहे.  (छाया- नसीर अत्तार)

दरवर्षी आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गाजरांची आवक होते; पण यंदा परतीच्या पावसाने गाजरांनाही सोडले नाही. आता लाल भडक गाजरांची आवक झाली आहे. साधारणता मिरज, सांगली परिसरातून गाजरांची आवक सुरू असून किरकोळ बाजारात ५० रुपये किलो आहे.

स्थानिक शेतकऱ्यांकडून पालेभाज्यांची आवक वाढल्याने मेथी, पोकळा, पालक, शेपूचे दर कमी झाले आहेत. मेथी, पोकळा दहा रुपये पेंढी आहे. हरभरा पेंढीची आवक होत असून घाऊक बाजारात पाच रुपये पेंढीचा दर आहे.


फळमार्केटमध्ये सफरचंद, चिक्कू, डाळींबची आवक मोठ्या प्रमाणात आहे. बोरांचीही आवक वाढू लागली आहे. अंजीरची आवक सुरू झाली आहे. गेले दोन आठवडे घाऊक बाजारात साखरेच्या दरात घसरण सुरू होती, पण किरकोळ मार्केट स्थिर होते. पण या आठवड्यात साखरेचे दर ४० रुपयांवर आले आहेत.

तूरडाळ, हरभरा डाळीचे दरही कमी होत असून तूरडाळ ७० रुपये किलोपर्यंत खाली आली आहे. शेंगतेल स्थिर असले तरी सरकी तेलाच्या दरात घसरण होत आहे. पोहे, शेंगदाणा, मैदा, रवा, शाबू, मूग, मटकीच्या दरात फारशी चढ-उतार दिसत नाही.

गुळाच्या आवकेत वाढ

गुऱ्हाळघरांचा हंगाम जोरात सुरू झाला असून गुळाची आवक वाढू लागली आहे. गत आठवड्यापेक्षा ३९१५ क्विंटलने आवक वाढली असून दरात फारशी चढ-उतार दिसत नाही.
 

Web Title: Onion, however, fell sharply, sugar and pulse prices fell in the week of Kolhapurundefined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.