कांदा ७० रुपये किलो, सीताफळाची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 01:50 PM2019-11-04T13:50:24+5:302019-11-04T13:52:22+5:30
किरकोळ बाजारात कांदा ७० रुपये किलोपर्यंत गेला असून, तोही दुय्यम प्रतीचा आहे. सीताफळाची आवक वाढली असून, गत आठवड्याच्या तुलनेत दरात घसरण झाली आहे. भाजीपाल्याचे दर स्थिर राहिले असले तरी कडधान्य मात्र थोडेसे तेजीत आहे.
कोल्हापूर : परतीच्या पावसाने नवीन कांद्याचे पीक उद्ध्वस्त झाल्याने कांद्याने कमालीची उसळी खाल्ली आहे. किरकोळ बाजारात कांदा ७० रुपये किलोपर्यंत गेला असून, तोही दुय्यम प्रतीचा आहे. सीताफळाची आवक वाढली असून, गत आठवड्याच्या तुलनेत दरात घसरण झाली आहे. भाजीपाल्याचे दर स्थिर राहिले असले तरी कडधान्य मात्र थोडेसे तेजीत आहे.
गेले वर्षभर कांदा २० ते २५ रुपये किलो राहिला. मध्यंतरी कांद्याच्या दरात थोडी वाढ झाली होती. गेले पंधरा-वीस दिवस परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. यामध्ये कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात आवक घटली असून, कोल्हापूर बाजार समितीत ५४७० पिशव्यांची आवक होत आहे. त्यामुळे दराने उसळी खाल्ली असून, घाऊक बाजारात १५ ते ५५ रुपयांपर्यंत कांद्याचा दर आहे. पण किरकोळ बाजारात ४० ते ७० रुपये दर पोहोचला आहे.
गेल्या आठवड्यात सरासरी ३० रुपये किलोचा दर होता. त्यामध्ये दुपटीने वाढ झाली असली तरी कांदाही ग्राहकांना दुय्यम प्रतीचा घ्यावा लागत आहे. बटाट्याचा दर प्रतिकिलो २५ रुपयांवर स्थिर असला तरी लसणाने मात्र भरारी घेतली आहे. घाऊक बाजारात ९० ते १८० रुपये किलोपर्यंत लसणाचा दर पोहोचला आहे.
पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. भाजीपाला खराब झाला असला तरी आवक बऱ्यापैकी आहे. त्यामुळे दरात फारशी चढउतार दिसत नाही. वांगी ६० रुपये, टोमॅटो ३०, तर ढब्बू ४० रुपये किलो आहे. गवार, भेंडी, कारली, दोडक्याच्या दरात फारसा फरक दिसत नाही. फ्लॉवर व कोबीही ग्राहकांच्या आवाक्यात आहे. मेथीचे दरही वाढले असून, २० रुपये पेंढी आहे.
फळमार्केटमध्ये सध्या सीताफळाची आवक वाढली आहे. दरातही घसरण झाली असून, किरकोळ बाजारात ५० रुपये किलोपर्यंत दर आहे. सफरचंदबरोबर संत्री व मोसंबीची आवक चांगली आहे. दिवाळीनंतर वास्तविक कडधान्य मार्केट स्थिर राहणे अपेक्षित होते; पण मूग, मटकी, चवळी, काळा वाटाणा व पांढरा वाटाणाच्या दरात किलोमागे दहा रुपयांची वाढ झाली आहे.
नवीन ज्वारी बाजारात आली असली तरी तीही दुय्यम प्रतीची आहे. एरव्ही २० रुपये असणारी ज्वारी ३० रुपये किलो आहे. सरकी तेल, तूरडाळ व हरभरा डाळीचे दर तुलनेत स्थिर राहिले असून, साखरेचा दर ४० रुपयांवर कायम राहिला आहे.
कोथिंबीरची पेंढी ७० रुपये!
पावसामुळे कोथिंबीरचे नुकसान झाले असून, तिच्या आवकेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे एकदम उसळी घेतली असून किरकोळ बाजारात ७० रुपये पेंढीचा दर झाला आहे.