बाजार समितीवर फेकले कांदे

By Admin | Published: February 28, 2015 12:18 AM2015-02-28T00:18:46+5:302015-02-28T00:21:33+5:30

शेतकरी आक्रमक : सौदे बंद पाडल्याचा परिणाम; हमालीचा वाद : तोडग्यानंतर सौदे पूर्ववत

Onions thrown at market committee | बाजार समितीवर फेकले कांदे

बाजार समितीवर फेकले कांदे

googlenewsNext

कोल्हापूर : बाजार समितीमधील कांदा मार्केटमध्ये हमालांनी शुक्रवारी अचानक सौदे बंद केल्याने शेतकऱ्यांनी समितीच्या दारात कांदा ओतून थेट समिती इमारतीवर ‘कांदा फेक’ करून संताप व्यक्त केला. सौद्यानंतर फाटलेल्या पिशव्या शिवणाऱ्या महिलांना हमाली कोणी द्यायची, यावरून अडते व हमाल यांच्यात वाद होता, अखेर चर्चेनंतर सौदे पूर्ववत सुरू झाले.
सौद्यासाठी ओतलेला कांदा पूर्ववत भरून पिशवी शिवण्याचे काम महिला करतात. या महिलांना पैसे कोणी द्यायचे हा वाद समितीत गेले अनेक वर्षे सुरू आहे. अडत दुकानदार शेतकऱ्यांच्या पट्टीतून कपात करून घेतलेले प्रति पिशवी तीन रुपये सौद्याला पिशवी लावण्यासाठी हमालांना देतात. तीन रुपयांऐवजी ३ रुपये ७५ पैसे करावी, अशी मागणी हमालांची होती, त्यानुसार २०१३ मध्ये पिशवीला ३ रुपये ७५ पैसे देण्यास जिल्हा उपनिबंधकांनी मान्यता दिली होती, पण अडत दुकानदारांनी ती लागू केली नव्हती. त्यावरून अडते व हमाल यांच्यात गेले अनेक दिवस अंतर्गत धुसफूस सुरू होती. वाढीव हमाली मिळावी अन्यथा ‘काम बंद’ करू, असा इशारा हमाल संघटनेने दिला होता. यासंदर्भात गुरुवारी दिवसभर सहायक कामगार आयुक्तांसमवेत अडते व हमाल संघटनेची बैठक झाली, पण तोडगा निघाला नाही. शुक्रवारी सकाळी काही हमालांनी कांदा मार्केटमध्ये काम सुरू केले, पण दुसऱ्या संघटनेने ते बंद पाडले. सौदे अचानक बंद पडल्याने शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी कांद्याच्या दोन पिशव्या समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या दारात ओतून घोषणाबाजी केली. संतप्त शेतकऱ्यांनी समितीवर ‘कांदा फेक’ सुरू केल्याने वातावरण चांगलेच तणावपूर्ण बनले. अखेर समितीचे सचिव संपतराव पाटील व सहायक सचिव दिलीप राऊत यांनी शेतकऱ्यांची समजूत काढत अडते, हमाल यांच्याशी चर्चा केली. जिल्हा उपनिबंधकांनी मान्यता दिल्याप्रमाणे प्रति पिशवी ३ रुपये ७५ पैसे प्रमाणे हमाली देण्यास अडत्यांनी मान्यता दिली. त्याचबरोबर सौद्यासाठी ओतलेला कांदा भरण्यासाठी महिलांना द्यायचे पैसेही अडत्यांनीच द्यायचा निर्णय झाला. त्यानंतर सौदे पूर्ववत सुरू झाले.

Web Title: Onions thrown at market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.