कोल्हापूर जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींचा ऑनलाइन कारभार ठप्प
By भीमगोंड देसाई | Published: August 27, 2024 01:57 PM2024-08-27T13:57:38+5:302024-08-27T13:57:55+5:30
आपले सरकार केंद्र अधांतरी : सरकारकडून मुदतवाढ नसल्याचे ऑपरेटरनी केले काम बंद
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : आपले सरकार केंद्र सुरू ठेवण्यासंबंधी शासनाचे स्पष्ट आदेश नसल्याने जिल्ह्यातील सर्व १०२५ ग्रामपंचायतींचा ऑनलाइन कारभार कोलमडला आहे. आपले सरकार केंद्रातील ऑपरेटरनी काम बंद केले आहे. परिणामी ग्रामस्थांना मिळणाऱ्या ऑनलाइन सेवा खंडित झाल्या आहेत. परिणामी सर्व ग्रामपंचायती ऑफलाइन झाल्या आहेत.
जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचातयींचा ऑनलाइन कारभार ७३५ आपले सरकार केंद्रातून चालत होता. ग्रामपंचायतीमधील या केंद्रातील खासगी ऑपरेटरना सन २०१६ पासून सीएससी-एसपीव्ही कंपनीतर्फे मानधन दिले जात होते. मात्र, या कंपनीचा करार ३० जून २०२४ रोजी संपला. त्यानंतर केंद्र चालवण्याची जबाबदारी शासनाने महाआयटी कंपनीकडे सोपविली. मात्र, महाआयटीने ग्रामपंचायतीमधील आपले सरकार केंद्र चालविण्यास नकार दिला. त्यानंतर सरकारने केंद्रासंबंधीचे स्पष्ट असे आदेश दिले नाहीत. केंद्रातील ऑपरेटरचा, बारा तालुक्यांतील व्यवस्थापक आणि एक जिल्हा व्यवस्थापकाच्या पगारासंबंधी प्रश्न निर्माण झाला आहे, म्हणून या सर्वांनी काम बंद केले आहे.
जन्म, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी, नमुना १ ते ३३ प्रमाणपत्रे, पीएम विश्ववकर्म, लाडकी बहीण नोंदणी, गती शक्ती, कर्मचारी मानधन, केंद्र चालक मानधन, ई-ग्रामस्वराज्य अशा ऑनलाइन सेवा बंद झाल्या आहेत. ग्रामपंचायतींच्या गतिमान कारभाराला ब्रेक लागला आहे. ऑफलाइनमुळे कारभारात शिथिलता आली आहे.
सरपंच, उपसरपंच
आपले सरकार केंद्र बंद असल्याने सरपंच, उपसरपंचांचे मानधन दोन महिन्यांचे मिळालेले नाही. त्यांनी आमदारांकडे तक्रारी केल्यानंतर ऑफलाइन मानधन काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण, इतर बंद असलेल्या सेवेसंबंधी शासकीय पातळीवर ठोस अशा हालचाली होताना दिसत नाहीत.
लाडकी बहिणीचा ऑनलाइन अर्ज नाही..
ग्रामपंचायतीमधील आपले सरकार केंद्रातील ऑपरेटरनीच काम बंद केल्याने लाडकी बहिणी योजनेतून ऑनलाइन अर्ज भरणे बंद आहे. ३१ ऑगस्टअखेर शेवटची मुदत आहे. अशातच केंद्रातील ऑनलाइन कामकाज बंद असल्याने लाडक्या बहिणीलाही ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.
ऑपरेटर बेरोजगार
कंपनीकडून केंद्रात काम करणाऱ्या ऑपरेटरना सात हजार रुपये मानधन मिळत होते. मात्र, कंपनीचा शासनाशी असलेला करार संपल्याने ऑपरेटरांची नोकरी गेली आहे. ७३५ ऑपरेटर बेरोजगार झाले आहेत.
जिल्ह्यातील केंद्रे ?
करवीर : १०८
चंदगड : ७७
पन्हाळा : ७३
शाहूवाडी : ७१
कागल : ७०
राधानगरी : ६५
भुदरगड : ६४
हातकणंगले : ५४
गडहिंग्लज : ५२
शिरोळ : ५१
आजरा : ३४
गगनबावडा : १६