टपाल कार्यालयांमधील आॅनलाईन व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 03:55 AM2018-02-24T03:55:47+5:302018-02-24T03:55:47+5:30
सर्वसामान्य नागरिक डोळे झाकून ठेवी ठेवत असलेल्या पोस्टाच्या देशभरातील कार्यालयांमधील ‘आॅनलाईन’ व्यवहार मुख्य सर्व्हर डाऊन झाल्याने ठप्प झाले आहे
समीर देशपांडे
कोल्हापूर : सर्वसामान्य नागरिक डोळे झाकून ठेवी ठेवत असलेल्या पोस्टाच्या देशभरातील कार्यालयांमधील ‘आॅनलाईन’ व्यवहार मुख्य सर्व्हर डाऊन झाल्याने ठप्प झाले आहे. दोन दिवस झाले तरी सर्व्हर डाऊनच असल्याने अधिकारी कर्मचाºयांपासून एजंटांपर्यंत सर्वचजण हवालदिल झाले आहेत.
देशभरातील टपाल कार्यालयांमधून होणाºया आॅनलाईन व्यवहाराचा मुख्य सर्व्हर चेन्नई येथे आहे. गुरुवारीच तो बंद पडला. दोन-तीन तासात सेवा पूर्ववत होईल, असा अंदाज होता. त्यामुळे पोस्टातून ‘थोड्या वेळाने या, आता सर्व्हर डाऊन झालाय’ असे सांगण्यात येत होते. नंतर ‘सर्व्हर डाऊन’ झाल्याचा फलकच लावण्यात आला. शुक्रवारी सायंकाळपर्यंत सेवा ठप्पच होती. शनिवारी सर्व्हर सुरू होण्याची शक्यता टपाल कार्यालयातील सूत्रांनी बोलून दाखविली. विविध बचत योजनांचे पैसे भरण्यासाठी महिन्याच्या २५ तारखेपर्यंत ते भरावेत, असा नियम आहे. त्यामुळे महिला प्रधान एजंटांच्या पैसे भरण्यासाठी फेºया सुरू होत्या. मात्र, सर्व्हर डाऊन असल्याने ते भरता आले नाहीत. पुन्हा दोन दिवस सुट्ट्या. मात्र, अशा परिस्थितीत महिनाअखेरपर्यंत पैसे भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याचे येथील मुख्य डाक प्रवर अधीक्षक रमेश पाटील यांनी सांगितले.
मुख्य सर्व्हर डाऊन झाल्याने सर्वत्र अडचण निर्माण झाली आहे; परंतु सेवा पूर्ववत करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून शनिवारी सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
- रमेश पाटील, मुख्य डाक
प्रवर अधीक्षक, कोल्हापूर