एसटीचे ऑनलाईन बुकिंग अनेकांना ठाऊकच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:28 AM2021-08-24T04:28:12+5:302021-08-24T04:28:12+5:30

भारतातील सर्वांत मोठे प्रवासी महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळाकडून प्रवाशांच्या सोईसाठी आधुनिक काळानुसार तंत्रज्ञानाची कास धरली आहे. दोन ...

Online booking of ST is not known to many | एसटीचे ऑनलाईन बुकिंग अनेकांना ठाऊकच नाही

एसटीचे ऑनलाईन बुकिंग अनेकांना ठाऊकच नाही

Next

भारतातील सर्वांत मोठे प्रवासी महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळाकडून प्रवाशांच्या सोईसाठी आधुनिक काळानुसार तंत्रज्ञानाची कास धरली आहे. दोन वर्षांपूर्वी महामंडळाने प्रवाशांच्या सोईसाठी एका क्लिकवर तिकिटांचे आरक्षण करता यावे यासाठी एमएसआरटीसी मोबाईल रिझर्व्हेशन ॲप सुरू केले आहे. यासोबतच महामंडळाच्या वेबसाईटवरूनही आरक्षण करता येते. गेल्या वर्षभरात ऑनलाईन बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्याचा विचार करता मागील दोन वर्षांत २३ लाख ५९ हजार ८१५ प्रवाशांनी ऑनलाईन बुकिंगचा लाभ घेतला. त्यात कोल्हापूरकरांचा सुमारे लाखभर लोकांचाही समावेश आहे.

या तालुक्यातून मोठा प्रतिसाद

एसटीच्या कोल्हापूर विभागातील आजरा, चंदगड, गडहिंग्लज, गारगोटी व मलकापूर या तालुक्यांतून मुंबई, पुणे, दूरच्या प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात जातात. या प्रवाशांनी गेल्या दोन वर्षांत ऑनलाईन बुकिंगला पसंती दिली आहे. गणेशोत्सव, दिवाळी या मोठ्या सणालाच अनेकजण आगावू आरक्षण करीत होते. मात्र, हा टक्का ऑनलाईनने वाढला आहे.

असे करा ऑनलाईन बुकिंग

मोबाईलद्वारे बुकिंग करताना प्रथम प्लेस्टोरमध्ये जाऊन एमएसआरटीसी डाऊनलोड करा. त्यानंतर हे संकेतस्थळ उघडा. त्यानंतर सोर्स उपलब्ध होतील. त्यामध्ये शिवनेरी, शिवशाही आणि सर्व असे ऑप्शन येतील. त्यापैकी एका ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर त्या बसचे आरक्षण किती हे समजेल. बुकिंग करताना प्रवासाची तारीख, वेळ घालावी. त्यात महिला, ज्येष्ठ आणि आरक्षित आसन किती हे दिसेल. आसनावर लाल रंग असेल ती सर्व आसने आरक्षित असतील. त्यानंतर ज्यावर आपण क्लिक कराल, त्यावर आपले आसन आरक्षित होईल. त्यानंतर पेमेंट विविध डेबिट कार्डद्वारे आपण करू शकता. त्यासाठीही ऑप्शन येतात. पैसे भरल्यानंतर तिकीट कन्फर्म होईल.

प्रतिक्रिया

महामंडळाकडून ही चांगली सोय केली आहे; पण त्याचा वापर कसा करायचा हे आम्हाला माहीत नव्हते. आता ही सुविधा कायम वापरेन.

राम कारंडे, प्रवासी, कोल्हापूर

प्रतिक्रिया

ऑनलाईन सुविधेमुळे घरबसल्या एसटीचे हव्या त्या ठिकाणाचे बुकिंग करता येते. ही सुविधा चांगली आहे. त्याचा वापर प्रवास करण्यापूर्वी यापुढे मी नियमित करीन.

- समीर शेख, प्रवासी, कोल्हापूर

कोट

यापूर्वी कोल्हापूर विभागात ऑनलाईन आरक्षणासाठी अल्पसा प्रतिसाद होता. मात्र, कोरोनानंतर हा प्रतिसाद सकारात्मक होत आहे. विशेष म्हणजे चंदगड, आजरा, मलकापूर, गडहिंग्लज या भागात सर्वाधिक ऑनलाईन बुकिंगला पसंती मिळत आहे.

- शिवराज जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी कोल्हापूर विभाग

Web Title: Online booking of ST is not known to many

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.