कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराची आॅनलाईन धुळवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 03:05 PM2019-03-15T15:05:46+5:302019-03-15T15:08:00+5:30
नसिम सनदी कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात अजून जाहीर प्रचाराचा नारळ फुटला नसला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादी आणि ...
नसिम सनदी
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात अजून जाहीर प्रचाराचा नारळ फुटला नसला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये प्रचाराची धुळवड सुरू आहे. विद्यमान खासदार धनंजय महाडिक आणि प्रा. संजय पाटील यांच्या प्रचाराची सर्व धुरा सोशल मीडियाच्या टीमने आपल्या हातात घेतली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही उमेदवारांची मुलेच आॅनलाईनच्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी धडपडत आहेत.
मागील लोकसभा निवडणुकीत व्हाट्स अॅप, फेसबुक, ट्विटर, यू ट्यूब यासारख्या सोशल मीडियाने आपले महत्त्व अधोरेखित केले होते. तरुण मतदार आणि अॅँड्रॉईड फोन वापरणाऱ्यांची संख्या एकूण मतदारांपेक्षा तीन चतुर्थांशपर्यंत गेल्याने यावेळच्या निवडणुकीतही सोशल मीडिया हेच प्रचाराचे प्रमुख साधन राहणार असल्याचे दिसत आहे. या माध्यमाची परिणामकारकता पाहून निवडणूक आयोगानेही याची गंभीर दखल घेतली असून, त्यांनाही आचारसंहितेच्या आणि निवडणूक खर्चाच्या कक्षेत आणले आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेतर्फे प्रा. संजय मंडलिक, तर राष्ट्रवादीतर्फे विद्यमान खासदार धनंजय महाडिक सलग दुसऱ्यांदा उमेदवार म्हणून आमनेसामने उभे ठाकले आहेत. या दोघांनी मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर आधार घेतला आहे. यासाठी स्वतंत्र टीम तयार केल्या आहेत. सध्या उमेदवारांच्या भेटीगाठी सुरू असून त्याच्या चित्रीकरणासाठी यातील एक टीम कायम त्यांच्यासोबत असते.
उर्वरित टीम प्रचार कार्यालयातील कंट्रोल रूममध्ये बसून आलेले चित्रीकरण पुढे पाठविण्याचे काम करतात. दर तासाला ते अपडेट केले जातात. उमेदवारांनी केलेले भाषण, केलेली विकासकामे, पूर्वीची भाषणे, भेटीगाठी यांचे फोटो लगेच अपलोड केले जात आहेत. मतदारांना घरबसल्या आपल्या हातातील मोबाईलवर सर्व भाषणे आणि नेत्यांच्या भूमिका कळत असल्याने मत तयार होण्यासही हातभार लागत आहे.
मुलांकडे टीमचे नेतृत्व
संजय मंंडलिक यांच्या टीमचे नेतृत्व वीरेंद्र मंडलीक करीत आहेत. त्यांना संग्राम पाटील मदत करीत आहेत, तर धनंजय महाडिक यांच्या टीमचे काम पृथ्वीराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली अमित पालोजी करीत आहेत. दोघांचीही स्वतंत्र दहाजणांची टीम सकाळी उठल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत राबताना दिसत आहे.
दोघांचीही आचारसंहिता
हे दोन्ही उमेदवार स्वत: फेसबुक व व्हॉट्स अॅपचा वापर करताना दिसतात. याद्वारे रोजचे कार्यक्रम लाईव्ह केले जात आहेत. हे करताना वैयक्तिक टीकाटिप्पणी होऊन उणेदुणे काढले जाऊ नये याची दक्षता घेतली जात आहे. पण फॅनक्लबसारख्या ग्रुपमधून मात्र कार्यकर्ते मात्र आचारसंहिता पायदळी तुडवत एकमेकांच्या दुखºया नसेवर पाय ठेवत असल्याने वादाचे प्रसंगही घडू लागले आहेत.
धनंजय महाडीक
- व्हॉट्स अॅप ग्रुुपद्वारे साडेचार लाख लोकांना एकाच वेळी मेसेज
- फेसबुक व युट्यूबवर रोजच्या भेटीगाठी, मेळावे, भाषण लाईव्ह
- संसदेत मांडलेले प्रश्न व केलेली भाषणेही पोस्ट
- महाडिक एमपी नावाने स्वतंत्र फेसबुक लाईव्ह पेज
प्रा. संजय मंडलिक
- विधानसभानिहाय व शिवसैनिकनिहाय स्वतंत्र व्हॉट्स अॅप ग्रुप
- रोजचा दौरा, मेळावे व्हॉट्स अॅप ग्रुपवर, भाषणे थेट फेसबुकवर लाईव्ह
- आॅडिओ, व्हिडीओ टीम स्वतंत्रपणे रोज मंडलिकांसोबत.
- एकाच वेळी ५० हजार जणांपर्यंत संदेश पोहोचविण्याची सोय.